पीक कर्जाचे व्याज सभासदांना परत करणार–संचालक अमोल राळेभात.
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी सलंग्न प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या नियमित कर्जदार सभासदांकडून वसूल केलेले व्याज तत्काळ कर्जदार सभासदांच्या बचत खाती जमा करणार असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.
कर्जदार सभासदांकडून ३१ मार्च २०२४ अखेर कर्ज रकमेवरील व्याज वसूल करण्यात आले होते, परंतु जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दिनांक १५/३/२०२४ ते ३१/३/२०२४ या कालावधीत वसूल झालेले व्याज परत केले जाणार असल्याचे बँकेने याअगोदरच जाहीर केले होते.
परंतु १५ ते ३१ मार्च २०२४ या दरम्यान भरणा केलेल्या सभासदांना याचा लाभ न देता यामध्ये वाढ करून १ मार्च ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत मुद्दल व्याजासह भरणा केलेल्या सभासदांचे व्याज परत करावे, अशी मागणी सर्व संचालकांनी सभेमध्ये एकमताने केल्यानंतर त्यास चेअरमन श्री.शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी लगेच होकार दिला आणि कार्यवाही करणेबाबत प्रशासनास सूचना दिल्या असे अमोल राळेभात यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे १ मार्च ते ३१ मार्च २०२४ यादरम्यान ज्या कर्जदार सभासदांनी मुद्दल व्याजासह कर्ज रकमेचा भरणा केला आहे त्यांचे रु. ३.०० लाखापर्यंतचे व्याज त्यांना परत केले जाणार असून याबाबत बँकेस तसेच सहकारी संस्थेस तशा सूचना दिलेल्या असून रकमा जमा करणेची कार्यवाही सुरु झालेली असून सभासदांच्या बचत खाती रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी दि. १ मार्च ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ज्या नियमित कर्जदार सभासदांनी कर्ज रकमेचा व्याजासह भरणा केला असेल त्यांनी संस्थेत जावून हमीपत्र सादर करावे जेणेकरून व्याजाची रक्कम बचत खाती जमा केली जाणार आहे, असे आवाहन बँकेचे संचालक श्री.अमोल राळेभात यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे मार्च २०२४ अखेर पीक कर्ज भरणा केलेल्या सभासदांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ, संस्था सचिव व बँक अधिकारी यांची सयुंक्त मिटिंग घेवून कर्ज वसुली व कर्ज वितरण या संदर्भात त्यांच्या अडीअडचणी व सूचना समजून घेतल्या.तसेच पीक कर्ज रक्कम सभासदांना लवकरात लवकर मिळावी यासाठी संस्था सचिवांनी नुतनीकरण प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित शाखेकडे तत्काळ सादर करावेत तसेच नुतनीकरण प्रस्ताव शाखेत प्राप्त झाल्यानंतर शाखाधिकारी/ इन्स्पेक्टर यांनी विनाविलंब सदरील प्रस्तावास वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी घेवून कर्ज वितरण तत्काळ सुरु करावे याबाबत सर्व संबधितांना सूचना दिल्या होत्या.
त्यामुळेच ज्या संस्थांचे नुतनीकरण प्रस्ताव योग्य त्या पुर्ततेसह मंजुरीसाठी प्राप्त झाले ते प्रस्ताव तत्काळ मंजूर करून घेवून संस्था सचिव, बँक कर्मचारी यांचेकडून सुट्टीदिवशी जादा वेळ काम करून घेवून दिनांक २३ एप्रिल २०२४ अखेर तालुक्यातील ९५ % वाटप पूर्ण झाले असून सभासदांच्या रूपे केसीसी खात्यावर ६६ कोटी ४४ लाख ३८ हजार ४०० इतकी रक्कम जमा केली असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here