

आंदोलनकर्त्यांनी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यास धरले धारेवर
राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर साखळी उपोषण मागे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातुन जाणार्या 548 डी च्या अतिक्रमणा संबधित प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत पाचव्यांदा संबधित अधिकारी व सर्व पक्षीय तसेच नागरीकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच शहरातील अतिक्रमण व रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने उपस्थितांनी शेवाळे यांना चांगलेच धारेवर धरले.

सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार जामखेड शहरातील अतिक्रमण हटवुन तातडीने रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करावे यासाठी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले होते. याच आनुशंगाने याठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, खा. निलेश लंके व सभापती प्रा.राम शिंदे यांनी देखील उपोषण स्थळी भेट दिली होती. शहरवासीयांच्या वतीने जामखेड शहरात शुक्रवार दि 6 मार्च रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अखेर आंदोलकांची दखल घेत प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांची सर्व पक्षीय नेते व नागरिकांन समवेत शनिवार दि 7 मार्च रोजी तहसील कार्यालयात याठिकाणी बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सर्वांनी शहरातील अतिक्रमण व रखडलेल्या रस्त्याच्या संबधित प्रश्न उपस्थित केले. तसेच चार पाच बैठका घेऊन देखील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. अनेक अपघात व लोकांचे जीव गेले आहेत यासह आनेक प्रश्न राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्या समोर उपस्थित केले. यावेळी त्यांना या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच लवकरात लवकर हद्द निश्चित केली नाही तर पुन्हा लगेच आंदोलन छेडण्याचा इशारा देखील उपस्थित आंदोलकांनी घेतला.
यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी देखील आंदोलक व जामखेड शहरातील नागरीकांच्या भावना जाणुन घेतल्या. त्यांनी अभियंता शेवाळे यांना प्रश्न उपस्थित करताना सांगितले की जामखेड शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी स्वतःहा लोक तयार आहेत, सर्व अधिकारी देखील उपलब्ध आहेत, लोकांच्या भावना तीव्र आहेत. पाच ते सहा वेळा बैठका होऊन देखील तुम्ही कामात हलगर्जीपणा करता हे बरोबर नाही. तुम्ही जबाबदार अधिकारी आहेत. यानंतर जर लोकांनी आंदोलने केली तर त्याला कोणत्याही प्रकारचे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने भुमिअभिलेख व नगरपरिषदेच्या मदतीने हद्द निश्चित करुन लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याचे सांगितले.

यावेळी सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन दिवसात रस्याचा प्रश्न मार्गी लावु तसेच त्यांनी आंदोलकांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की जामखेड शहरातुन जाणार्या पंचदेवालय मंदिर, कोठारी पेट्रोलपंप ते साकत फटा पर्यंत भुमिअभिलेख यांनी दिलेल्या रा. म. च्या मालकीच्या जागेतील हद्दीतील काम हे रा. म. विभाग करणार आहे. तसेच या मार्गावरील हद्दीपलीकडील अतिक्रमणे काढायचे काम नगरपरिषद काढायचे आहे असे ठरले आहे. हद्द कायम करण्याचे काम दि 24 मार्च 2026 पुर्वी करायचे आहे. जेणेकरुन 24 मार्च 2026 तारखेनंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करता येईल व त्या प्रमाणे रा. म. चे उर्वरित सुरू आसलेले काम देखील लवकरच पुर्ण करु असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी सुरू केलेले साखळी उपोषण आखेर शनिवार दि 7 मार्च 2026 रोजी मागे घेण्यात आले.

या बैठकी दरम्यान कर्जत उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, राष्ट्रिय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, मुख्याधिकारी अजय साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, अंदोलनकर्ते व समाजसेवक अवधुत पवार, उपनगरध्याक्ष पोपट राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक प्राचार्य विकी घायतडक, ॲड. प्रवीण सानप, वसीम शेख, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, ॲड. मयुर डोके, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, राहुल उगले, प्रा लक्ष्मण ढेपे, अमोल गिरमे, कुंडल राळेभात, यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.



