अतिक्रमणा विरोधात पुकारलेल्या जामखेड बंदला शंभर टक्के प्रतिसाद

खा. निलेश लंके यांच्या मध्यस्थीने बेमुदत बंद मागे, मात्र साखळी उपोषण सुरूच

जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुजित चेमटे व संबधीत वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत हद्द शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाची हद्द निश्चित करीत नाहीत यासाठी सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत पुकारलेल्या जामखेड बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र दुपारी खा. निलेश लंके यांनी आंदोलकांनास्थळी भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यानंतर बेमुदत जामखेड बंद मागे घेण्यात आला,मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. याच आनुशंगाने शनिवारी सर्व संबंधित अधिकारी रस्त्याची हद्द निश्चित करण्यासाठी जामखेड मध्ये दाखल होणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर सुजित चेमटे यांनी दि. ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे दि. २६ फेब्रुवारी रोजीचा जामखेड बंद मागे घेतल्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार अतिक्रमण काढण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया न केल्याने मागे घेतलेले जामखेड बंदचे आंदोलन पुन्हा पुकारले असून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुजित चेमटे व संबधीत वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत हद्द निश्चित करत नाहीत तोपर्यंत दि. ६ मार्चपासून सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने जामखेड शहरात बेमुदत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

गेली साडेतीन वर्षांपासून जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ते अनेक अडथळे व कासव गतीने सुरू आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. यामध्ये अनेक जण जायबंदी तर काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. हे काम सुरू असताना अनेक अडचणींबरोबरच अतिक्रमण काढणे हा मोठा अडथळा ठरत आहे. यासाठी विविध पक्षसंघटनांकडून अनेक आंदोलने तर प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका. तसेच जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेटू देऊन अतिक्रमण काढण्याच्या सुचना करूनही काहीच होत नसल्याने अखेर जामखेडकरांनी अखेर सर्वपक्षीय व बेमुदत जामखेड बंदचे हत्यार उपसले होते.

सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा. निलेश लंके यांनी भेट दिली. तसेच अतिक्रमणा बाबत सर्व माहिती जाणुन घेतली. यानंतर खा. लंके यांनी तातडीने प्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. तसेच तातडीने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले नाही तर मी स्वतःहा पुणे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला. यानंतर संबधित अधिकाऱ्यांनी शनिवार दि ७ मार्च २०२६ रोजी सकाळी हद्द निश्चित करण्यासाठी जामखेड शहरात येणार असल्याचे सांगितले. तसेच तातडीने हद्द निश्चित करुन देण्याचे आश्वासन देखील खा. निलेश लंके व उपस्थित आंदोलकांना सांगितले.

खा. निलेश लंके यांच्या मध्यस्थीने जामखेड शहरात पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंद जरी मागे घेण्यात आला असला तरी जो पर्यंत अतिक्रमणे हटविण्यात येत नाहीत तो पर्यंत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, पवनराजे राळेभात, प्रा. विकी घायतडक, महेश निमोणकर, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, प्रदिप टापरे, विकास (तात्या) राळेभात, राहुल उगले, प्रशांत राळेभात, वसीम सय्यद, प्रा. लक्ष्मण ढेपे, सुनिल जगताप, बाबा चंदन, अनिल सदाफुले, संजय वराट, कुंडल राळेभात व रंगनाथ राळेभात यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here