रोखठोक अहमदनगर ….
संपूर्ण जगाने धास्ती घेतलेल्या कोरोना रीपोर्ट च्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रुग्ण कोरोना निगेटिव्ह आसुन देखील त्याचा रीपोर्ट पॉझिटिव्ह तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अहमदनगर येथील रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून विळद घाट येथील कृष्णा डायग्नोसिसच्या प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक बबनराव खोकराळे (रा. पाइपलाइन रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फीर्यादीत म्हटले आहे, की माझे वडील बबनराव खोकराळे यांच्या घशात दुखत असल्याने दि १३ ऑगस्ट रोजी डॉक्टरांच्या सल्ल्याने भाऊ अरविंद खोकराळे त्यांना कोविड सेंटरला घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी वडिलांची तब्येत ठिक असल्याचे सांगून तपासण्या करून सोडणार असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी तेथे गेलो असता, वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलविल्याचे समजले. या बाबत विचारणा केली असता, वडिलांच्या आणखी तपासण्या करायच्या असल्याचे तेथे सांगण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान कोविडमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, भाऊ अरविंद याने विम्याच्या कामासाठी संबंधित रुग्णालयाकडून वडिलांची फाईल मागवून घेतली. त्यातील अहवाल अन्य डॉक्टरांना दाखविले असता, ते बोगस असल्याचे आढळून आले. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली असता, त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी चारही डॉक्टरांनी रुग्णाची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्याचे सांगितले. मात्र, अहवाल सादर न करता, त्यासाठी मुदतवाढ मागितली.
महापालिकेच्या मान्यताप्राप्त कोविड तपासणी सेंटरकडे बबनराव खोकराळे यांच्या अहवालाची मागणी केली असता, त्यांनी अहवालच आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर विळद घाट येथील रुग्णालयात चौकशी केली असता, तेथे वडिलांची दोन वेळा चाचणी केल्याचे आढळून आले. तसेच ते स्वत: चाचणीसाठी गेले होते, असेही समजले. मात्र, वडील अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. दोन्ही अहवालावर वडिलांचे नाव होते, पण मोबाईल क्रमांक चुकीचे होते. त्या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधला असता, दोन वेगवेगळ्या व्यक्ती निघाल्या. त्यांनी अन्य रुग्णालयात उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आले. कृष्णा डायग्नोसिसचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी वडिलांचा बनावट कोरोना अहवाल तयार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.