जामखेड रोखठोक

‘कोरोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खुप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना देखील संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनो, आपल्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडणुक कार्यक्रम लागलेल्या गावांतील नागरिकांना घातली आहे.

कर्जत तालुक्यातील सुमारे ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आ.रोहित पवारांनी ही घोषणा केली आहे.बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आ.पवार यांनी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासुनच आ. पवार यांनी मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख म्हणुन आपली भुमिका पार पाडत विविध उपक्रमांतुन मदत केली आहे. कोणत्याही अडचणीच्या काळात संकटात सापडलेल्या लोकांना पक्ष, गट-तट, राजकारण विरहित भावनेतून त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. गाव पातळीवर अधिक योजना व त्यांची माहिती पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी विकास समित्या स्थापन करून गावांना सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडून विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघते. गावच्या सलोख्यास बाधा पोहोचते आणि गटा-तटाच्या राजकारणात गावचा विकास खुंटतो. सध्याच्या काळात प्रत्येक व्यवसायाला आणि त्यात काम करणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रशासनावरही याचा ताण अधिक वाढला आहे. अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना खुप मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘बिनविरोध निवडणूक’ ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार आहे. त्यामुळे आ.रोहित पवारांची ही साद साहजिकच बिनविरोध निवडणुका पार पाडणाऱ्या गावांसाठी विकासाच्या दृष्टीने फायद्याची असुन अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी सर्वच सुजाण नागरिक प्रयत्नशील असतील असा विश्वास आ.पवार यांनी व्यक्त केला आहे.
_____________________________

तर याद राखा,गाठ माझ्याशी आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कसलीही गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कुणी करू नये अन्यथा, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे! असा सज्जड दमच आ.रोहित पवारांनी या निमित्ताने भरला आहे.त्यामुळे रोहित पवार यांचे ग्रामपंचायत कारभारावरही लक्ष असल्याचे अधोरेखित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here