पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर गोंधळ; पोलिसांचा लाठीजार्ज
बीड : पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरील मेळाव्यानंतर गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्यानं पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही करावा लागला. पंकजा मुंडेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाही काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.
पंकजा मुंडेंच्या या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. ज्यावेळी पंकजा मुंडे या भाषणासाठी व्यासपीठावर दाखल झाल्या त्यानंतरही काही हुल्लडबाज तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी या कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुनच शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. “माझं भाषण होईपर्यंत हाताची घडी, तोंडावर बोट पाहिजे. ही धिंगाणा घालण्याचं ठिकाण नाही,” असं सांगत त्यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना तंबी दिली होती त्यानंतर हा गोंधळ थांबला होता.
पण जेव्हा पंकजा मुंडेंचं भाषण संपलं आणि त्या व्यासपीठावरुन खाली उतरुन आपल्या ताफ्याकडे गेल्या त्यानंतर तरुणांची गर्दी ही व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागली. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचं आवाहन पोलीस करत होते. पण प्रचंड गर्दी झाल्यानं कोणीही बाजूला हटत नव्हतं. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर ही गर्दी पांगली.
सुमारे आठ ते दहा मिनिटं हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर काही वेळानं आणखी पोलीस कुमक तिथं बोलवावी लागली. त्यानंतर पंकजा मुंडे यांची गाडी रवाना करण्यात आली. सुरुवातीला खासदार प्रितम चव्हाण यांनी देखील समर्थकांना भागवान बाबांची शांततेची शिकवण असल्याचं सांगत शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही काही उत्साही कार्यकर्ते शांत राहण्याच्या मनस्थितीत नव्हते.