‘अशा कर्मचाऱ्यांचं खरंतर कौतुक करायला पाहिजे’, निलंबित केलेल्या लेडी कंडक्टरसाठी आ. रोहित पवार मैदानात
मंबई, 5 ऑक्टोबर : स्वत:चे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे. मंगल गिरी असं या महिला कंडक्टरचं नाव आहे.
तिच्या विरोधात करण्यात आलेल्या या कारवाईवर अनेकांकडून विरोध करण्यात येतोय. सोशल मीडियावर एसटी महामंडळाने महिलेविरोधात केलेल्या कारवाईवर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण महिला कंडक्टरच्या बाजूने उभे राहिले आहेत. महिलेवर निलंबनाची टोकाची कारवाई करण्यापेक्षा तिला समज दिली असती, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून दिली जात आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील महिलेच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांनी ट्विटरवर या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. “अनेक ताणतणाव असूनही दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देणारे एसटीचे कर्मचारी हे खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी InstaStar होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
गणवेशात रिल्स केल्याचा आक्षेप असेल तर ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन ही चूक सुधारण्याची संधी देता आली असती. पण त्याऐवजी थेट निलंबनाची कारवाई हा घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो. यात योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला द्याव्यात, ही विनंती”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलेल्या महीला कंडक्टर यांनी म्हटले आहे की माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असून काही संघटनांच्या वादातून ही कारवाई झाल्याचा आरोप मंगल गिरी यांनी केलाय. माझ्यासारखे अनेक जण एसटी मंडळात आहेत. ते सोशल मीडियावर रिल्स करतात. पण त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल मंगल गिरी यांनी केलाय. दरम्यान, मंगल गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतरही सोशल मीडियावरून तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगल गिरी यांच्यावरील कारवाईचा चाहत्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
मंगल गिरी यांच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे आणि अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय.