तिसरी मुलगी झाल्यास मुलीच्या नावे ठेवणार एक लाख रुपयांची ठेव, अहमदनगरच्या काकासाहेब म्हस्के फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम.

अहमदनगर प्रतिनिधी

मुलीच्या जन्मासंदर्भात नगरच्या काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाऊंडेशनकडून एक अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या दाम्पत्यास दोन मुलीनंतर तिसरीही मुलगी झाली असेल, अशा मुलीच्या नावावर काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाऊंडेशनकडून एक लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे, अशी घोषणा म्हस्के मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.

यावेळी वकील अशोक भोसले, डॉ. अजित फुंदे, रामदास ढमाले, समीर दाणी आदी उपस्थित होते. डॉ.मस्के म्हणाले की 1975 सालापासून म्हस्के फाऊंडेशनच्या विविध संस्थांचे कार्य सुरू करण्यात आले आहे. काकासाहेब म्हस्के यांनी समाजकार्यासाठी जो वसा घेतला होता. तो वसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत.

2022 सालानंतर ज्या दाम्पत्यास सलग तीन मुली झालेल्या आहेत. अशा मुलींच्या नावे नगरच्या अंबिका महिला बँकेमध्ये एक लाख रुपयांची ठेवण्यात येणार असून त्या मुलीच्या आठराव्या वर्षी म्हणजेच लग्नापर्यंत तिला हे पैसे दिले जाणार आहेत. सदरची योजना राज्यभर राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार असून यासाठी अंबिका महिला बँकेची आम्ही निवड केली आहे. नगर मधील नावाजलेली बँक आम्ही याकरता घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही असा निर्णय घेतला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, माझी पत्नी ही त्यांच्या घरातील तिसरी मुलगी होती. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी असा निर्णय घेतला व त्या माध्यमातून आम्ही ही योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. बँकेमध्ये गेल्यानंतर जे काही नियम अटी दिलेल्या आहेत. त्याचे पालन सगळ्यांना करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here