ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर; इच्छुकांची तयारी पाण्यात. जामखेडच्या तीन ग्रामपंचायतींचा समावेश

अहमदनगर प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे ७ हजार ६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळं राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. यात नगर जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु केलेल्या इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला असून त्यांची तयारी पाण्यात जाणार आहे.

राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे ७ हजार ६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७ हजार ६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणेकरिता आवश्यक ते नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जश्या संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत.

नगर जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ संपत आहे. यात श्रीरामपूर ६, शेवगाव १२, पाथर्डी ११, संगमनेर ३७, कर्जत ८, कोपरगाव २६, अकोले १०, नेवासा १३, जामखेड ३, नगर २८, राहाता १२, पारनेर १६, राहुरी ११ आणि श्रीगोंदा १० अशा २०४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार याठिकाणी आता प्रशासक येणार आहे.

जामखेड तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ३ ग्रामपंचायती

जामखेड तालुक्यातील शिऊर राजुरी व रत्नापूर या ग्रामपंचायतीचा देखील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या ग्रामपंचायतीवर देखील प्रशासक येणार आहे. या बाबत चे लेखी पत्र देखील जामखेड तहसील कार्यालयास प्राप्त झाले आसल्याची माहिती जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here