अंबाजोगाई प्रतिनिधी
लातूर – अंबाजोगाई महामार्गावर आज दि २३ एप्रिल शनिवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अरुंद महामार्गामुळे बर्दापूर ते अंबासाखर टप्प्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आज मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्तात्रय पवार (४०), शिवाजी पवार (४५), यश बोडके (९), श्रुतिका पवार (६), गुलाबराव सोमवंशी (५०) आणि कमल जाधव (३०) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
अरूंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा
लातूरहून आलेला चौपदरी महामार्ग बर्दापूरच्या पुढे दुपदरी होऊन अरूंद होतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असेलल्या बर्दापूर ते अंबासाखर दरम्यान सतत अपघात होऊन अनेकांचे बळी गेले असून निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याच्या घटना सुरूच आहेत. किमान तातडीने या टप्प्यात गतीरोधक तरी टाकावेत अशी मागणी होत आहे.