जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्र शहीद

अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागात काल (२१ मे) झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र, अहिल्यानगर जिल्ह्य़ातील जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले.

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागात काल (२१ मे) झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. जवान संदीप गायकर हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. देशसेवेचे व्रत पत्करत त्यांनी अनेक दुर्गम भागांमध्ये कर्तव्य बजावले. मात्र, काल दहशतवाद्यांविरोधात झुंज देताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

किश्तवाडमध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या दोन पॅरा एसएफ, ११ आरआर आणि सातवी आसाम रायफल आणि एसओजी यांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहिम राबवली. सिंहपोरा चटरू इथं पथकांकडून शोध सुरू होता. त्यावेळी जोरदार चकमक झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. चार दहशतवाद्यांच्या एका गटाला सुरक्षा दलांनी घेरलं आहे. परिसरात अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चकमकीच्या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आलेत.

गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा (अहिल्यानगर) येथे उद्या (२३ मे) आणण्यात येणार आहे. गावात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शहिद गायकर यांच्या पश्चात त्यांचे वडील पांडुरंग गायकर, आई, पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here