खर्डा-ईट रोडवरील बेलेश्वर पुलावर एका खव्याच्या व्यापार्यास मोटारसायकल वरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकुन कारमधील 2 लाख 13 हजार रुपये घेऊन दुचाकीस्वार पसार झाले. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की खव्याचे व्यापारी उत्पादकांचे पैसे देण्यासाठी कारमधून जात असताना ही कार पखरूड येथील बेलेश्वर देवस्थानच्या पुलावर आली असता, पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करून कार थांबविली. व्यापाऱ्याने दरवाजा उघडताच त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डिकीतील सुमारे २ लाख १३ हजार रुपये घेऊन दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. ही थरारक घटना बुधवारी भरदुपारी घडली.
भूम तालुक्यातील अंजनसोंडा येथील खवा व्यापारी विनोद मच्छिंद्र महाडिक हे खवाभट्टी चालकांचे पेमेंट देण्यासाठी आपल्या कारमधून (क्र. एमएच २५ एजे ७३४९) अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावाकडे जात होते. ते पखरूडमार्गे जाताना बेलेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाठीमागून आलेल्या दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करून कार रोखली.
व्यापारी महाडिक यांनी दरवाजा उघडताच दुचाकीवरील दोघांनी हातातील मिरची पूड त्यांच्या डोळ्यात फेकली. आजुबाजुला कोणीही नसल्याने आरडाओरड करूनही फायदा झाला नाही. तोपर्यंत संबंधित दोघांनी कारची डिक्की उघडून आतील सुमारे २ लाख १३ हजार रुपये घेऊन पोबारा केला. भरदुपारी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वाशी ठाण्याचे पो. नि थोरात यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. भर दुपारी ही घटना घडल्याने परिसरात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.