बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ, अचानक केसगळती; ३ दिवसांतच पडतंय टक्कल!
बुलढाणा: बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय. काही दिवसात ४० ते ५० लोकांना टक्कल पडलंय. नागरिकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर आलंय.
शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचे टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. पण ज्यांनी शॅम्पू कधीच वापरला नाहीय त्यांचीही अचानक केस गळती झाल्याचं दिसून आलंय. बोंडगाव, हिंगणा, कालवडसह तीन गावात टक्कल पडतंय. पुरुषांसह महिलांचाही यामध्ये समावेश आहे. लोक यामुळे दहशतीखाली आहेत. आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचलीय. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. तात्काळ सर्वेचे आदेश देण्यात आले आहेत. नमुने घेऊन यावर खुलासा करा असं सांगण्यात आलंय.
शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत आहे. काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजारने थैमान घातले.कुटुंबची कुटुंब या व्हायरस चा बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने रहिवाशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिन्ही गावातील अनेक व्यक्तीची केस एकाएकी कमी होऊन गळून जात आहेत.यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.
केसगळतीच्या समस्येनंतर सर्वेक्षण झाले आहे व पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही कळवण्यात आले आहे. या आजारामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत. शाम्पू ने असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेत या गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर राबवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर बाबी बाबत अवगत केले आहे.
शेगाव तालुक्यातील गोंडगाव कालवळ व हिंगणा वैजनाथ या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण आढळून आले असून एका गावात 15 ते 20 रुग्ण आतापर्यंत आढळून आल्याने तिन्ही गावांमधील जवळपास 60 रुग्ण केस गळतीचे निदर्शनास आले आहे.एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्ती चे केस गळून पडत असल्याने टक्कल सुद्धा होत आहे.
तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे आम्ही पणं आश्चर्यचकित झालेलो आहोत. तालुका आरोग्य विभाग कडून जिल्हा साथ रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या प्रकाराबाबत कळवण्यात आले आहे.नेमका प्रकार का घडत आहे याचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी ड़ॉक्टर दिपाली भायेकर यांनी दिली.