शहरातील मोकाट जनावरे अन् भटकी कुत्री उठली नागरिकांच्या जिवावर, नगरपरिषदेचे दुर्लक्ष
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. जामखेड शहराच्या मुख्य रस्त्यावर व गल्लोगल्ली ही संख्या वाढत असून, नागरिकांना त्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री अक्षरश: नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. त्यांना प्रतिबंध घालणारी जामखेड नगरपरिषदेची यंत्रणा झोपत आहे का? असा संतापजनक सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
जामखेड शहरात मोकाट जनावरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यांवरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. मोकाट जनावरे तसेच भटकी कुत्री यामुळे दररोज अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आपली गुरे-ढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध जामखेड नगरपरिषदेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात नगरपरिषद कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने नगरपरिषद हतबलता झाली आहे की काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे.
जामखेड शहरातील विविध रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाटे जनावरे कळपा-कळपाने फिरत आहेत. तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावरच आपला ठिय्या मांडत आहेत. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. बीड रोड, खर्डा रोड, तसेच नगररोड येथील रस्त्यावरील दुभाजकावर ही मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसतात आणि अचानकपणे हे मोकाट जनावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने नागरिक संतापले आहेत.
शहरातील बीड रोड, खर्डा रोड व नगररोड परिसरात अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढले आहे. याठिकाणी रस्त्यात बसलेली जनावरे व भटके कुत्रे रात्रीच्या वेळी डोकेदुखीच ठरत आहे. १० ते १५ जनावरांचा कळप असल्याने त्यांना हुसकावणे कठीण जाते. वाहनचालकांना अर्ध्याच रस्त्याचा वापर करीत ये-जा करावी लागत असल्याने अपघात झाले आहेत.
त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक चौकात नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव सहन करावा लागतो. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या मागे घोळका करुन बसलेले कुत्रे पाठलाग करतात. बहुतांश वेळा हे श्‍वान अंगावर धावून जातात. यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात. तर, श्वानदंशाने जखमी झालेल्यांचेही प्रमाण मोठे आहे. याप्रश्नाकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या मोकाट जनावरांचा जामखेड नगरपरिषदेने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक सातत्याने करीत असतात. मात्र, नगरपरिषदेच्या नेहमीच्या दुर्लक्षामुळे ही मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
कारवाई करणारेदेखील मोकाट
मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी जामखेड नगरपरिषदेकडे स्वतंत्र विभाग आहे. या विभागाची यंत्रणा आहे. मात्र हा विभाग आणि पर्यायाने यंत्रणाच आपली जबाबदारी पार न पाडता मोकाट असल्याच्या संतापलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. मोकाट जनावरे शहरात धुडगूस घालत असताना त्यांना प्रतिबंध घालण्यासाठीची यंत्रणा काय करते, हा सवाल आहे. मोकाट जनावरे नागरिकांच्या जिवावर उठली असतानादेखील त्यांना प्रतिबंध का घातला जात नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते प्रकाश काळे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here