जामखेड शहरातील मोरे वस्ती येथे घरफोडी करून साडेतीन लाखांची चोरी ,तीन महीन्यात एकाच घरात दुसर्यांदा झाली चोरी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील मोरे वस्ती याठिकाणी रक्षाबंधनासाठी गावी गेलेल्या गळगटे कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 30 हजार रुपये रोख व 1 लाख 20 हजार रुपयांचे लहान मुलांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गळगटे यांच्या घरात तीन महीन्यात दुसर्यांदा चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अहमदनगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी गणेश दत्तात्रेय गळघटे रा. साई नगर, मोरे वस्ती, तालुका जामखेड हे दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी बीड येथे रहात असलेल्या त्यांचा भाऊ प्रभाकर दत्तात्रय गळगटे यांच्याकडे रक्षाबंधनाच्या सणा निमित्त आपल्या कुटुंबा समवेत गेले होते. यावेळी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजाच्या कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातील रोख 2 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम व 1 लाख 20 हजार रुपयांचे लहान मुलांचे दोन तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
यानंतर फिर्यादी गणेश दत्तात्रेय गळगटे हे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपल्यानंतर दि 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते आपल्या जामखेड येथील घरी आल्यानंतर त्यांना घराचा कोयंडा तुटलेला दिसला व घराममध्ये जाऊन पाहिले असता आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले यानंतर त्यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली फीर्याद दाखल केली. दिनांक 20 रोजी सकाळी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्र्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. जितेंद्र सरोदे हे करत आहेत.
तीन महिन्यात गळगट्टे कुटुंबियांच्या घरात दुसऱ्यांदा चोरी
तीन महिन्यांपूर्वी देखील मोरे वस्ती येथील गळगटे कुटुंबीयांचे दि 9 मे 2024 रोजी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 24 हजार 679 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला तीन महिने होत नाही तोच पुन्हा गळगटे यांच्या घरी साडेतीन लाखांची चोरी झाली आहे. जामखेड शहरातील नवीन मोरे वस्ती येथील साईनगर भागात आनेक नवीन घरे व बंगले झाले आहेत. मात्र या घरांकडे जाण्यासाठी रस्त्यांची व लाईटची सोय नाही. त्यामुळे वारंवार मोरे वस्ती भागात चोरीच्या घटना घडत आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत रस्ता व्यवस्थित नसल्याने रात्रीचे गस्त घालणारे पोलीस देखील याठिकाणी फीरकत नाहीत आणि चोरटे याच संधीचा फायदा घेऊन मोरे वस्ती भागात चोरी करतात. त्यामुळे तातडीने रात्रपाळी दरम्यान पोलिसांनी मोरे वस्ती भागात गस्त वाढवावी आशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.