आमची तुतारी वाजणारच!! दोघांपैकी एकजण लढणार, वाचा काय म्हणाल्या सौ. राणीताई लंके
जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत उमेदवार घोषित केलेला आहे. खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपने मैदानात उतरवलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण यावर निलेश लंके यांच्या निमित्ताने गुढ निर्माण झालं आहे. आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र लंके यांनी आपली इच्छा स्वतः अजून पर्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त केलेली नाही.
आमदार लंके हे शरद पवार यांना वारंवार भेटत आहेत. मात्र त्यांचा अजून अधिकृत पक्षप्रवेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जामखेड येथे काल २१ मार्च रोजी बीड रोडवरील आशा भेळ या नविन हॉटेल रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी आलेल्या आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पत्रकारांनी उमेदवारी विषय छेडले. पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न केला की तुतारी आपण हातात घेणार की लंके साहेब? यावर राणीताई लंके यांनी, या बाबत साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही. पण दोघांपैकी एक नक्कीच उमेदवार लंके घराण्यातला असेल, असे सांगितले. पत्रकारांनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला असता राणीताई लंके यांनी, लवकरच कळेल की तुतारी मी वाजवणार की लंके साहेब. पण दोघांतून एक नक्की फिक्स आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असं बोललं जातंय. मात्र पक्षात प्रवेश केल्यानंतर ते स्वतः उमेदवारी करणार की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उमेदवारी करणार याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेतून आमदार लंके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांना पक्ष बदल करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष करावयाचा असेल तर अगोदर राजीनामा देणे गरजेचे असल्याचं बोललं जातंय, अन्यथा पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांच्यावर अजित पवारांच्या पक्षाकडून कारवाई होऊ शकते.
असे झाल्यास आमदार निलेश लंके यांच्यासमोर तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. कदाचित याच कारणाने आमदार निलेश लंके यांचा शरद पवार राष्ट्रवादी गटातील अधिकृत पक्षप्रवेश रेंगाळला आहे. सुरू असलेल्या चर्चेनुसार आमदार निलेश लंके हे राजीनामा न देता स्वतः ऐवजी राणीताई लंके यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या विचारात आहेत. मात्र खासदार सुजय विखे यांच्यासमोर तगडे आव्हान देण्यासाठी निलेश लंके यांनीच निवडणूक लढवावी, अशी शरद पवार गटाने सांगितले असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे लंके दांपत्यापैकी लोकसभेची उमेदवारी नेमकी कोण करणार याचीही उत्सुकता लागलेली आहे. येत्या दोन-तीन दिवसात यावर निर्णय होईल असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे राणीताई लंके यांनी लंके दांपत्या पैकी एक जण निवडणुकीतच्या रिंगणात नक्कीच असेल असं सांगितल्याचं दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here