छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं एक सप्टेंबर २०२३ रोजी आंदोलकांवर पोलिसांनी जो अमानुष लाठीचार्ज केला, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अॅड. देविदास आर. शेळके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. अंतरवाली सराटी इथं १ सप्टेंबर रोजी जवळपास १५०० पोलिस आणि एसआरपीएफ जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना अतिशय निर्दयी पद्धतीने मारहाण केली. आंदोलन उधळून लावण्यासासाठी आंदोलकांवर अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. गोळीबार देखील करण्यात आला. आंदोलकांच्या अंगावर छर्रे झाडण्यात आले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी घरात घुसून मारले. त्यामध्ये १०० पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले किंवा त्यांना मुका मार लागला. या अमानुष मारहाणीत अनेक आंदोलक गंभीररित्या जखमी झालेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार केला त्याला विरोध म्हणून व जीव वाचवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात दहा-बारा पोलिस जखमी झालेत. त्याविरोधात पोलिसांनी ७०० पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केलेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांवर जो निर्दयी हल्ला केला आणि ज्या अधिकाऱ्यांच्या तोंडी अथवा लेखी आदेशाने हा हल्ला करण्यात आला; त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
तरी या मारहाण प्रकरणी जे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत; त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ आणि पारदर्शीपणे न्यायालयीन समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. तसेच ज्या आंदोलकांना मारहाण झाली किंवा जखमी झालेत; त्यांच्या मुलभूत आणि मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन झालेले असल्याने त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या फौजदारी जनहित याचिकेत करण्यात आलेली आहे.