मोठी बातमी! सुषमा अंधारेंना नडला, कानशिलात लावल्याचा बीड जिल्हा प्रमुखांचा दावा; बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी!

बीड: उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना, “मी दोन चापटा लावल्याचा दावा करणाऱ्या” बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्या बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होत आहे. त्याआधीच बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाकडून राज्यभरात काढण्यात येत असलेल्या महाप्रबोधन यात्रेचे नेतृत्त्व करत असलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर बीडमधील जिल्हाप्रमुखाने गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा दावा ठाकरे गटाचे बीडमधील जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. यामुळे आमच्यात भांडण झाले, त्यावेळी मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा लगावल्या, असे आप्पासाहेब जाधव यांनी जाहीरपणे सांगितले होते. आप्पासाहेब जाधव यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला असला तरी या प्रकाराची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.

या सगळ्यानंतर एका रात्रीत मातोश्रीवरुन आप्पासाहेब जाधव यांच्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बीडच्या संपर्कप्रमुखांवरही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर आता आप्पासाहेब जाधव काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

बीडमध्ये २० मे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुषमा अंधारे गुरुवारी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या सगळ्या धुमश्चक्रीत वरेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आप्पासाहेब जाधव यांची गाडीची काच फोडली होती.

यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी परस्पर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर आगपाखड केली होती. सुषमा अंधारे या बीड जिल्ह्यात खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी, फर्निचर आणि सोफ्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. माझे जिल्हाप्रमुखपद देखील सुषमा अंधारे यांनी विक्रीला काढले आहे. मी पक्ष वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काडं केली. माझ्या लेकराबाळांच्या मुखातला घास काढून पक्षवाढीसाठी पैसे खर्च केले. पण सुषमा अंधारे यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सुषमा अंधारे आणि माझं भांडण झालं, तेव्हा मी सुषमा अंधारे यांच्या दोन चापटा लगावल्या, असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला होता.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

आप्पासाहेब जाधव यांच्या खळबळजनक दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ रिलीज केला, माझ्यावर लाखभर रुपयाचा आरोप केला. तेव्हा मला सगळा गुंता लक्षात येत आहे. हे जे काही सगळं चाललं आहे, ते महाप्रबोधन यात्रेला बदनाम करण्यासाठी सुरु आहे. संजय राऊत यांच्या सभेआधी वादळ निर्माण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. परंतु, मिंधे गटाने कितीही प्रयत्न केले तरीही महाप्रबोधन यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तरी ही सभा होणार, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. तसेच आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला.

2 COMMENTS

  1. सर तुम्ही व्यवस्थित टायपिंग केलेली नाही काय लिहलंय तेच समजत नाही.जरा नीट टायपिंग करा.

  2. दिघोळ ते तेलंगशी रस्ता सुध्दा गायब आहे मागील चार वर्षात झालेला खडी करण रस्ता आज पूर्ण नामो निषण पुसले आहे . मोठ मोठे खडडे झाले आहेत घाटाच्या तोंडापर्यंत हा रस्ताच दिसत नाही केवळ पायवाट असलाचा भास होतो . ७० लाख रुपये खर्चून केलेला रस्ता गेला कुठे याची शासनाने चौकसी करावी . रस्ता हा नियमा प्रमाणे झाला का? अधिकाऱ्यांनी काम चालू असताना पहाणी केली का ? इस्टीमेट प्रमाणे . रस्ता झाला का हे तपासणे गरजेचे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here