
गल्लीतील भांडण सभागृहात आणले; हक्कभंगाच्या कारवाईवर आ. रोहित पवार यांचा सभापती प्रा. राम शिंदेंना टोला.
नागपूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हक्कभंगाची कारवाई केली. तसेच पोलीस चौकशीचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईवरुन आ. रोहित पवारांनी सभापती प्रा.राम शिंदेंना टोला लगावला.
“जामखेड नगरपरिषदेची निवडणूक सुरू असताना आमचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांनी सभापती प्रा.राम शिंदे यांच्यावर टीका केली. ती टीका शिंदे यांच्या पदावर नव्हती. मात्र, त्या टीकेने शिंदे यांचा अहंकार दुखावल्यामुळे त्यांनी गल्लीतील भांडण सभागृहात आणले आणि हक्कभंगाची कारवाई केली. त्यांनी पदाची गरिमा राखायला हवी होती. त्यासाठी आवश्यक पडल्यास त्यांनी फडणवीस किंवा नार्वेकरांकडून क्लासेस घ्यावे”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना लगावला. आमदार रोहित पवार यांचे सहकारी सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाची कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बोलताना आ. रोहित पवार यांनी मोरेंवरील कारवाई गल्लीतील भांडण सभागृहात आणण्यासारखे असल्याचा उल्लेख केला.

“राम शिंदे यांच्यावरील टीकेमुळे विधानपरिषद सदस्यांचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो. मोरे भावनेच्या भरात बोलले. त्याच काळात राम शिंदे चार गाड्यांचा ताफा घेऊन त्या मतदारसंघात फिरत होते. आम्ही उमेदवार देत असताना सामान्य कुटुंबातील उमेदवार दिलेत. तर शिंदे यांनी त्यांच्या पक्षातून गुंड, अवैध वेश्या व्यवसायाशी संबंधित, सावकार अशा उमेदवारांना दिली. त्यावरून शिंदेंवर टीका केली. मात्र, त्यांनी गल्लीतील भांडण सभागृहात आणले आणि हक्कभंगाची कारवाई केली”, असा टोला रोहित पवारांनी लगावला. तसेच “निवडणुकीच्या काळात एकमेकांवर केलेल्या टीकेवर सभागृहात चर्चा करण्याऐवजी बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायला हवी. शिंदे यांनी त्या पदाचा मान राखायला हवा’, असा देखील चिमटा रोहित पवारांनी काढला. विधानसभेच्या निवडणुकीत आ. रोहित पवार यांनी सभापती प्रा.राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. तेव्हापासून दोन्ही नेत्यांनी नेहमीच शाब्दिक भांडणे सुरू असतात. शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.





