मोठी बातमी ! २००० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद; ‘या’ तारखेपर्यंत राहाणार वैध….
नवी दिल्ली: 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून 2 हजाराच्या नोटा बंद होतील, अशा चर्चा सुरु होत्या. सोशल मीडियावर वारंवार याबाबत चर्चा सुरु व्हायची. तर रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने त्यावर स्पष्टीकरण दिलं जात होतं. 2 हजाराच्या नोटा बंद होणार नाही, असं सातत्याने स्पष्ट करण्यात येत होतं. पण आता रिझर्व्ह बँकेने अधिकृतपणे त्याच दृष्टीकोनाने पाऊल सुरु केल्याचं चित्र दिसत आहे.

नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. 2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली.

2018-19 सालीच आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती. मार्च 2017 पर्यंत दोन हजार रुपयांच्या 89 टक्के नोटा चलनात होत्या, 31 मार्च 2018 ला ज्याची एकूण किंमत 6.73 लाख कोटी रुपये होती. 31 मार्च 2023 ला हीच रक्कम 3.62 लाख कोटी एवढी झाली, जी 10.8 टक्के होती. 23 मे 2023 पासून नागरिकांना बँकेमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत, एकावेळी नागरिकांना 20 हजार रुपयांपर्यंतच्याच 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. तसंच बँकांनी आतापासूनच 2 हजार रुपयांच्या नोटा देणं बंद करावं, असे आदेशही आरबीआयने केले आहेत.









