तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली हकालपट्टी.
कर्जत प्रतिनिधी : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल मधून सोसायटीच्या सर्व साधारण जागेवरून निवडणूक लढवित असल्याने पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत थेट पक्षीय संबंध नसला तरी सध्या सुरू असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापु लागले आहे. वरिष्ठ पातळीवर राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता असताना स्थानिक पातळीवरही पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:चे वेगळे निर्णय घेत आहेत. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बळीराम यादव यांना भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये प्रवेश केला आहे. तालुकाध्यक्षच भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षचिन्ह नसते. असे असले तरी राजकीय दृष्ट्या नेता ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाचं म्हणून हे पॅनल ओळखलं जातं. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश झाल्याने शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्याचे मानले जाते.