धक्कादायक! सहकारी शिक्षिकेशी अनैतिक संबंध अन् ब्लॅकमेलिंग; जिल्हा परिषद शिक्षकाने मृत्यूला कवटाळले
नांदेड : अनैतिक संबंधाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
हदगांव तालुक्यातील गारव्हाण जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनिल मोहन चव्हाण असं या शिक्षकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्या शिक्षकाने चिट्ठी देखील लिहीली आहे. शाळेतील महिला शिक्षकेकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्या शिक्षकाने चिठ्ठीत लिहले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल चव्हाण हे हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषद (ZP) शाळेमध्ये शिक्षक पदी कार्यरत होते. 2014 साली त्यांची या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झाली होती. सेवे दरम्यान त्यांचे शाळेतील एका महिला शिक्षिकेशी सूत जुळले. मात्र काही वर्षानंतर त्यांच्यात कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होत होता.
या दरम्यान संबंधित सहशिक्षिकेने पैश्याची मागणी करत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. दूसरीकडे पतीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण शिक्षकाच्या पत्नीला लागली होती. एकीकडे ब्लॅकमेल सुरु होतं आणि दूसरीकडे या प्रकरणाची घरी माहिती लागल्याने ते मानसिक तणावात होते. यामुळेच संबंधित शिक्षकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या दिवशी परीक्षेचे पेपर तपासायचं आहे असं खोटं सांगून ते शिक्षक बुधवारी रात्री घरातून निघून गेला. शाळेत पोचल्यानंतर शाळेतील खोलीत गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शाळेत आलेल्या सेवकाला अनिल चव्हाण यांचा मृतदेह लटकेलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मनाठा पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट देखील आढळून आली.
यामध्ये “सहशिक्षिका वारंवार पैशाची मागणी करत मला ब्लॅकमेल करत आहे. या ब्लॅकमेलला मी थकून गेलोय, त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे” चव्हाण यांनी लिहिले आहे. दरम्यान अनिल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत. दरम्यान चिठ्ठीत ज्या महिलेचे नाव आहे, पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.