जामखेड मधिल एक बडा नेता स्वझेंड्याच्या बळावर उभी करणार पर्यायी शक्ती.

जामखेडमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप……

जामखेड, दि. 31 (प्रतिनिधी) – गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षात राहून सामाजिक कार्यात वाहून घेतलेला आणि स्वकर्तृत्वावर स्वतःची प्रतिमा निर्माण केलेला जामखेड तालुक्यातील एका बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप व शिवसेनेत न जाता स्वझेंडा हाती घेऊन कर्जत- जामखेड तालुक्यात तिसरा पर्याय लवकरच उभा करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा निष्ठावंत असलेला हा नेता नवीन वर्षात तालुक्यात राजकीय भूकंप करणार असून राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान,नव्या इनिंगला सुरूवात करणार्‍या या नेत्याच्या राजकीय हालचालींकडे सध्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक असे धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजप, शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसण्याच्या मार्गावर आहे. कारण, कोणताही राजकीय वारसा नसताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विश्वासू व जिल्हा कार्याध्यक्षापासून ते कर्तृत्वाने थेट प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारणारे तालुक्यातील एका बडा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या नेत्याने गेल्या दोन वर्षापासून कर्जत व जामखेड तालुक्यात सामाजिक कामाच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा उभारली असून त्यांच्या या उपक्रमाला कर्जत-जामखेड तालुक्यातील असंख्य तरुण जोडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बुद्धिमान,अभ्यासू,संघर्षशील,स्वकर्तृत्वाने उभारी घेणारे युवा नेतृत्व म्हणून ’या’ नेत्याकडे पहिले जाते. मात्र त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतेने खळबळ निर्माण झाली आहे. त्याबरोबर अजून कोण कोणते कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा नेता आपली स्वतंत्र फळी उभारत असून सामाजिक कार्यातून तरूणांचे मोठे संघटन उभे केले आहे.

कोणताही राजकीय वारसा नसतांना जामखेड तालुक्यासह शेजारच्या कर्जत तालुक्यातही तरूणांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. जामखेड-कर्जत तालुक्यातील युवकांना बरोबर घेऊन सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये नवक्रांती उभी करण्याचा या नेत्याचा प्रयत्न आहे. या नेत्याने सामाजिक उपक्रमाव्दारे तरुण वर्गाकडे आपला मोर्चा वळविला आहे.

अधिकाधिक तरुण आपल्यासोबत जोडले जावेत,यासाठी गेल्या दोन वर्षापासून त्यांची यंत्रणा दोन्ही तालुक्यात काम करीत आहे. नेतृत्व संपन्न व सामाजिक कार्याची आवड असलेल्या तरुणांना समाजकारणात सक्रिय करून भूमिकेशी आणि विचारांशी एकनिष्ठ करून समाजसेवा करण्यासाठी अठरा ते पस्तीस वयोगटाच्या तरुणांचे संघटन सुरू केले आहे.लवकर हा नेता आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते. तसे झाल्यास जामखेड-कर्जत तालुक्यातील स्वाभिमानी युवकांसाठी एक सक्षम तिसरा पर्याय उपलब्ध होणार हे मात्र नक्की….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here