

अरणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारा विरोधात सदस्यांचा उपोषणाचा इशारा
जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अरणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा चार ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतचे सदस्या रब्बाना सादिक शेख,रुपाली शंकरराव गदादे- गजराबाई चंद्रकांत पारे, तात्यासाहेब बलभीम निगुडे या चौघा सदस्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषणाचे अंदोलन करण्याचा इशारा दिला. आज 30 डिसेंबर 2022 रोजी अरणगाव ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना याबाबते निवेदन दिले आहे. या निवेदनात आठ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

अरणगाव ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या मागण्या खालील प्रमाणे
१. अरणगाव येथील पाणी पुरवठा महिन्याला एकदा होत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे तो सुरळीत करण्यात यावा.
२. मागील चार महिन्या पासून सरपंच व ग्रामसेवक मासिक मीटिंग न घेता मनमानी कारभार करत आहेत त्यांची चौकशी लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
३. माहितीचे अधीकार अर्ज देऊन, अपील करून देखील नियमभंग करून माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
४. मासिक मीटिंग न घेता किंवा कोणत्याही मासिक मीटिंगमध्ये ठराव न घेता बोगस कामे दाखवून ग्रामपंचायतच्या खात्यात रक्कम उचलण्यात आलेली आहे, त्याची चौकशी करुन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५. अरणगाव पशु वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे, म्हणून त्यांना गाव देऊन कायम हजर राहण्याबाबत आदेश द्यावेत.
६. अरणगाव येथील शासकीय विहिरीवरील गौण खनिज चोरी केल्या बाबत आपल्या कडील तक्रारीची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
७. पारेवाडी स्मशानभूमी येथील गौण खनिज उत्खनन झाल्याचे सिद्ध झालेले आहे व दोषींना तहसीलदार साहेब यांनी दंड देखील अकारलेला आहे, परंतु राजकीय दबावापोटी संबधितांकडून अजून देखील दंड वसूल करण्यात आलेला नाही, तो लवकरात लवकर वसूल करण्यात यावा.

८. अरणगावचे ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभार, सतत गैरहजर, नियमबाह्य काम इत्यादी वेळोवेळी लिखीत तक्रारी करून देखील त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
वरील सर्व मागण्यांची पूर्तता किंवा ठोस लेखी आश्वासन न मिळाल्यास येत्या 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अरणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रब्बाना सादिक शेख,रुपाली शंकरराव गदादे- गजराबाई चंद्रकांत पारे, तात्यासाहेब बलभीम निगुडे, या चार ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.






