

बचत गटामुळे महीलांचे आर्थिक सक्षमीकरण घडुन येते – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
जामखेड पंचायत समिती व बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून बचत गटांना 27 लाखांचे कर्जवाटप
जामखेड (प्रतिनिधी) महिलांनी स्वतःला अबला न मानता स्वाभिमानाने पुढे आले पाहिजे. उमेदच्या माध्यमातून विविध बँकांचे कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय केले पाहिजे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली. बचत गटामुळे महीलांचे आर्थिक सक्षमीकरण घडुन येत आहे आसे मत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी महीलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.


जातेगाव येथील 11 महिला स्वयंसहायता समूहांना 22 लाखाचे तसेच माळेवाडी येथील 5 महिला स्वयंसहायता समूहास 5 लाखाचे कर्ज वितरण बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जातेगावच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ बोलत होते.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी बापूराव माने, बँक मॅनेजर केशव तांदळे, ग्रामसेवक कैलास जाधव, प्रभाग समन्वयक हरिबा चांदगावे, ग्रामपंचायत उपसरपंच रविराज गायकवाड, सी आर पी वर्षा गायकवाड, अपेक्षा पाचणकर, कृषी सखी रेखा गायकवाड उपस्थित व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की महिलांनी स्वतःला अबला न मानता स्वाभिमानाने पुढे आले पाहिजे. उमेदच्या माध्यमातून विविध बँकांचे कर्ज घेऊन छोटे-मोठे व्यवसाय केले पाहिजे. त्यातून अर्थार्जन सुरू झाले की महिला सक्षमीकरण अधिक गतीने करता येईल. लिज्जत पापडचा व्यवसाय 4 महिलांनी केवळ 80 रुपयात सुरू केला होता. आज शेकडो कोटी रुपयांचा व्यवसाय उभा झाला आहे.

स्वतःमधील क्षमता ओळखून उमेदच्या दशसूत्रीचे पालन करावे तरच महिलांचा सर्वांगीण विकास होईल. पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन पोळ यांनी दिले. यावेळी उपस्थित महिलांनी पोळ यांच्याकडे घरकुल व विविध योजनांचा लाभ गरजू महिलांना मिळण्याबाबत साकडे घातले.






