धक्कादायक! श्रीगोंदा येथिल पोलीस कर्मचार्याची गळफास घेऊन आत्महत्या
श्रीगोंदा प्रतिनिधी, दि ऑक्टोबर
श्रीगोंदा तालुक्यात एका सहायक फौजदाराने आज गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. त्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, कुटुंबियांनी वरिष्ठांकडून जाच होत असल्याचा आरोप केल्याने राहुरीप्रमाणेच या प्रकरणालाही वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्यात मुळा धरणावर बंदोबस्तावरील पोलिसाने देखील काही दिवसांपुर्वीच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनमधील सह्यायक फौजदार सुनील धोंडीबा मोरे (वय ५४) यांनी लक्ष्मीनगर ता. श्रीगोंदा येथे घरातील
लोखंडी जिन्याला साडीच्या सह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. बेलवंडी पोलीस ठाण्यात सह्यायक फौजदार म्हणून मोरे कार्यरत आहेत ते तीन महिन्यांपासन वैद्यकीय कारणासाठी रजेवर होते. आज त्यांनी आत्महत्या केली.
त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि मोरे यांच्यात तीन महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. यांनतर मोरे रजेवर होते. त्यानंतर तीन-चार दिवसांपूर्वी दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षकांनी मोरे यांना बोलावून घेत त्यांच्याकडील तपासावरील गुन्हे पोलीस ठाण्यात जमा करून घेतले. यावेळी त्यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाले. तेंव्हा पासून मोरे मानसिक तणावात असल्याचे जाणवत होते, असा कुटुंबियांचा आरोप आहे.
आज बुधवारी दसऱ्या निमित्त घरातील सदस्य सकाळी पुजेचे साहित्य आणण्यासाठी बाजारात गेले होते. तेवढ्या वेळात मोरे यांनी घरातील साडीने लोखंडी जिन्याच्या अँगलला गळफास लावून घेतला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मोरे यांचे चुलत भाऊ बाळासाहेब गणपत मोरे यांनी खबर दिली.
काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मुळा धरणावरील चौकीत भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) या पोलिस हवालदाराने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. आघाव यांच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होता, तसेच चौकशीही सुरू होती. त्यातून वाचविण्यासाठी एक अधिकारी आणि दोघा कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आघाव यांनी चिठ्ठीत केला आहे. त्यानुसार तिघांविरूदध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी सुरू असतानाच श्रीगोंदा तालुक्यात दुसऱ्या एका पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.