रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वंचित कुटुंबांना लखपती करा- प्रकाश पोळ; पंचायत समिती जामखेड येथे रोजगार हमी योजनेच्या 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात. 

जामखेड प्रतिनिधी

गोरगरीब, वंचित, दारिद्रयरेषेखालील , भूमिहीन कुटुंबांना प्रवाहात आणण्यासाठी रोजगार हमीच्या वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून लखपती करण्यासाठी रोजगार सेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

पंचायत समिती जामखेड येथे सुरू झालेल्या 3 दिवसीय रोजगार हमी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी दयानंद पवार, कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी सुनील मिसाळ, बापूराव माने, सिद्धनाथ भजनावळे, एपीओ समीर शेख, तांत्रिक सहायक संजय वायभासे, प्रदीप निमकर, विकास घाडगे, संभाजी ढोले, शिवराज जगताप, तज्ञ प्रशिक्षक संतोष शिंदे , निलेश तनपुरे, ऑपरेटर नितीन व्हावळ, अशोक गाजरे, विशाल पांढरे, सुरेश सोंदलकर व तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पोळ म्हणाले की रोजगार हमी योजनेचे जनक महाराष्ट्र राज्य आहे. परंतु तरीही पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, केरळ अशा राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र का कमी पडत आहे याचा विचार रोजगार सेवक व सर्व संबंधितांनी करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना मजुरी रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यामाध्यमातून गावागावात शाश्वत मत्ता तयार करणे ही रोजगार हमी योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

मागील दोन वर्षांपासून तिसरे उद्दिष्ट समोर आले आहे ते म्हणजे कुटुंबांना लखपती करणे. रोजगार हमी योजनेत अनुज्ञेय असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक कामाच्या माध्यमातून कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दारिद्य्ररेषेखालील असलेले, भूमिहीन असलेले कुटुंब शोधून त्यांना रोजगार हमीच्या माध्यमातून लखपती करण्यासाठी काम केले पाहिजे.

काय म्हणाले गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक मागणी गायगोठे, शेळीपालन शेड तसेच शाळेच्या संरक्षक भिंती, रस्ते, अंगणवाडी या कामांना आहे. परंतु जामखेड तालुक्यात अकुशल कामांचे प्रमाण कमी असल्याने वरील कुशल कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करता येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात अकुशल कामे जसे की वृक्षलागवड, फळबाग लागवड, घरकुल, मुरमाचे रस्ते, जलसंधारण कामे झाली पाहिजेत. जेणेकरून या कामातून जास्तीत जास्त मनुष्यदिन निर्मिती होऊन कुशल कामासाठी अवकाश तयार होईल. जेव्हा 60 रु चे अकुशल काम होते तेव्हा 40 रु. कुशल कामासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे जितके अकुशल काम जास्त तितके कुशल काम जास्त होणार आहे आशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले.

रोजगार हमी विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, आयुक्त गोयल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा होजगे, प्रांत अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या दिवशी परिचय, योजनेची ओळख, उद्दिष्टे, दुसऱ्या दिवशी शिउर या गावात शिवार फेरी, गावातील समस्या व त्यावर रोजगार हमीच्या माध्यमातून उपाय, तिसऱ्या दिवशी योजना गरीब, भूमिहीन, एकल महिला यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी परिणामकारक काम कसे करावे याबद्दल मार्गदर्शन, राज्यातील यशोगाथा, व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रोजगार सेवकांना प्रमाणपत्र वितरण असा भरगच्च कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी या प्रशिक्षणास तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर व वन विभागाचे अधिकारी हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here