कोल्हापुर प्रतिनिधी 

गोव्यात फिरायला गेलेल्या चंदगडच्या ११ तरुणांना ‘आमच्या हॉटेलमध्ये स्वस्तात जेवण मिळते,’ असे सांगून एका खोलीत डांबून बेदम मारहाण करून आणि ब्लॅकमेल करीत लुटल्याचा वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे.

जाहीरात

सचिन भारद्वाज, आशीष सिंग (दोघेही रा. हरियाणा) आणि मुबारक मुल्ला (रा. तमिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य तीन महिलांची नावे समजू शकली नाहीत. न्यायालयाने सहाजणांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.

चंदगड तालुक्यातील एका गावातील 11 महाविद्यालयीन तरुण पर्यटनासाठी गोव्याला गेले होते. गुरुवारी (दि. 26) परत येत असताना म्हापसा येथे संशयित तरुणांनी ‘आमच्या हॉटेलमध्ये स्वस्तात जेवण देतो,’ असे सांगून त्यांना एका ठिकाणी नेले. सर्व तरुणांना एका खोलीत डांबून त्यांच्याकडील रोख रक्कम व ऑनलाइन रक्कम जबरदस्तीने लुटली. या तरुणांना बेदम मारहाण करून पर्यटनाच्या नावाखाली ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच आरोपींनी मुलींना बोलावून या तरुणांचे नग्न व्हिडीओ करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सर्व तरुण भीतीच्या छायेखाली होते.

चंदगड येथे आल्यानंतर तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधून संरक्षणाची मागणी केली. तसेच रविवारी (दि. 29) म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी तिघांना अटक केली. तसेच या प्रकरणात आज आणखी तीन महिलांना अटक केली होती. संबंधित हॉटेल आणि परिसरातील सीसीव्ही फुटेज, तसेच चौकशीतून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, न्यायालयाने सहाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली दखल

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेमध्ये विशेष लक्ष घालून कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. ‘गोव्यातील म्हापसा, पणजी आदी ठिकाणी राहणाऱ्या अनोळखी व्यक्तींना आपली ओळख सिद्ध करूनच भाड्याने घरे किंवा रूम घेता येईल. याबाबत पोलिसांनी ओळख पटवून घ्यावी, असा आदेश मुख्यमंत्री सावंत यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here