जामखेड प्रतिनिधी
प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे शिकवले पाहिजे. कारण शिक्षकच शाळेची प्रगती करतो. शाळेचे नावलौकिक हे शिक्षकांमुळे प्राप्त होते असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.
या वेळी कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे शाळा व्यवस्थापन समिती दत्तवाडीचे अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ, उपाध्यक्ष गणेश कुमटकर,आष्टी तालुका मंडल कृषी अधिकारी विकास सोनवणे, पं. स. जामखेडचे कृषी विस्तार अधिकारी सिद्धनाथ भजनावळे,पत्रकार अविनाश बोधले, आदर्श शाळा बसरवाडीचे मुख्या. एकनाथ दादा चव्हाण यांच्यासह शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे पालक, तालुक्यातील शिक्षक बांधव तसेच धोंडपारगाव पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक व महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती.
तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी या ठिकाणी इ.५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना गटविकास अधिकारी म्हणाले की लोकसहभागातून साकारलेले व राज्यातील विविध नामांकित शिष्यवृत्ती तज्ज्ञ आणि अधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलेले अशा प्रकारचे मोफत शिष्यवृत्ती शिबिर हा राज्यातील शिक्षण क्षेत्रातला अभिनव व प्रेरणादायी उपक्रम असून गुणवत्ता संवर्धनासाठी तो राज्याला दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी समारोपाच्या कार्यक्रमात काढले
ADVERTISEMENT

स्वागतगीत हाळगाव शाळेतील गीतमंचातल्या विद्यार्थीनींनी सादर केले.’चला गुणवत्ताधारक होऊ’ हे मनोहर इनामदार लिखित ‘विद्यार्थी ध्येयगीत’ ज्ञानेश्वरी सचिन शिंदे या दत्तवाडी शाळेतील विद्यार्थीनीने अप्रतिमरित्या गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सर्वांची मने जिंकली. विद्यार्थी मनोगतातून साक्षी निकम (लटकेवस्ती),अवंती गाढवे (बावी),अमित गायकवाड(नागेश विद्यालय जामखेड),केतन ढवळे (हाळगाव),सक्षम सानप (पिंपरखेड) आणि आर्यन मोहळकर (दत्तवाडी) या विद्यार्थ्यांनी तर तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीम.दुर्गाराणी काळे (हाळगाव) यांनी शिबिरातील अनुभव मांडत शिबीर कालावधीत लाभलेले सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक ,अन्नदाते व आयोजक यांसंबंधी कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
शिबीर कालावधीत अहमदनगर, उस्मानाबाद,बीड व पुणे जिल्ह्यांतील विविध नामांकित शिष्यवृत्ती तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले. गटशिक्षणाधिकारी शिक्षण मंडळ पुणे यांनी सदिच्छा भेट देऊन दत्तवाडी शाळा हे एक पवित्र गुरूकुल असून नाविन्यपूर्ण , दिशादर्शक व प्रेरणादायी उपक्रमांची प्रयोगशाळा आहे असे गौरवोद्गार काढले. राजगुरूनगर जि.पुणे येथील मधुकर गिलबिले यांचा शैक्षणिक,सामाजिक व साहित्यिक कार्याच्या गौरवार्थ मानपत्र देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रकाश पोळ गटविकास अधिकारी जामखेड, कैलास खैरे गटशिक्षणाधिकारी जामखेड, मनोज धस शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.बीड तथा संस्थापक वसुंधरा प्राथ.विद्यालय आष्टी, लक्ष्मीकांत देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.अहमदनगर तसेच बाबासाहेब कुमटकर , सुरेश कुंभार व मुकुंदराज सातपुते या केंद्रप्रमुखांनी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी पुणे येथील प्रसिद्ध शिष्यवृत्ती तज्ज्ञ मा.सौ.मंगल अहेर गावडे लिखित ‘शिष्यवृत्ती बोलकी मार्गदर्शिका’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
सलग सहा दिवस जामखेड येथील प्रसिद्ध उद्योजक रमेशभाऊ गुगळे व कीशोर आंदुरे यांनी अल्पोपहाराची तर समारोप कार्यक्रमानंतर सौ.वर्षा रामेश्वर ढवळे व सौ.मंजिरी रामचंद्र गाढवे या शिक्षिकांतर्फे सर्वांना मिष्टान्नभोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडेवस्ती शाळेचे मुख्या.विजय जेधे यांनी केले ,तर प्रास्ताविक व आभार दत्तवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिबिराचे आयोजक मनोहर इनामदार यांनी केले.
चौकट
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी स्वतःचा मुलगा ‘अश्वत’ याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संचाच्या पुस्तकांचे वाटप करून आपल्यातील कृतिशीलता व दातृत्त्व यांचे अनोखे दर्शन घडवले.


