मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडी येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही. आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाहीये. कृपया असे कृत्य करू नये. अन्यथा संघर्ष अटळ आहे. जय अहिल्या जय मल्हार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. अहमदनगरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांनी या संदर्भातील परवानगी अर्ज सादर केला आहे.

ADVERTISEMENT

ते म्हणाले, “समस्त आठरापगड बहुजन समाजाचं दैवत आणि हिंदु संस्कृतीचा जीर्णोधार करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती येत्या ३१ मे ला आहे. दरवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी अहिल्यामातेच्या जन्मस्थळी चौंडी येथे मोठ्या ताकदीनं जमायचे आहे. या निमित्तानं विस्थापितांना संघर्षाची ताकद देणारा होळकरशाही इतिहास आपल्याला आठवायचा आहे. या इतिहासावर,आपल्या प्रेरणास्थळावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना आपल्याला जाब विचारायचा आहे.”

“या निमित्ताने मी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे मुळ गाव होळ, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव किल्ला, मल्हारी मार्तंड श्री खंडोबारायाची जेजूरी, सरसेनापती बी.के कोकरे यांचे उंडवडी गाव अशा विविध ठिकाणी आपल्या इतिहासाचा जागर करत यात्रेला सुरूवात करतो आहे. दि.२९ मे ते ३१ मे अशी ही यात्रा असणार आहे. या यात्रेची सांगता पुण्यश्लोक अहिल्यामातेचे चौंडी येथे दर्शन घेऊन होणार आहे. यात्रेत तमाम बहुजन समाजाला आपल्या पराक्रमी इतिहासाचा जागर करायचा आहे. अहिल्यादेवी पर्वाचा जागर करायचा आहे. आणि आपल्या हक्काच्या, अधिकाऱ्याच्या लढ्याला अजून मजबूत करायचे आहे.”, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here