जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील आणखी 10 गावांना जल जीवन मिशन अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, त्याचबरोबर या गावांना १२ कोटींच निधी देखील मंजूर झाला आहे.
आमदार रोहित पवार यांनी जिल्हा व राज्य पातळीवर वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता मतदारसंघातील पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पार पडलेल्या प्रशासकीय बैठकीत जामखेड तालुक्यातील धनेगाव, नायगाव, सरदवाडी, राजुरी, मोहा, पिंपरखेड, शिऊर, वाकी, सावरगाव, साकत या गावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनुसार आता जल जीवन मिशन अंतर्गत १२ कोटी १३ लाख १० हजार ७९७ कोटींच्या जवळपास निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेली पाण्याची अडचण ही आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोडवली जात असल्याचं दिसून येत आहे.
यासोबतच मिरजगावसाठी २२ कोटी, खर्ड्यासाठी १४ कोटी आणि कोंभळीसह १२ गावांसाठी ३२ कोटी रुपये आमदार रोहितदादा यांच्या प्रयत्नातून यापूर्वीच मंजूर झाले आहेत. रोहितदादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने यापूर्वी झालेल्या बैठकीत जामखेडमधील १६ गावांना १४.१८कोटी रुपये आणि कर्जतमधील २८ गावांना ३१.९२कोटी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झाले असून त्या योजना निविदा स्तरावर आहेत. पूर्वी योग्य सर्वेक्षण न झाल्यामुळे अनेक गावे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहिली होती. पण रोहित पवार हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी व्यवस्थित सर्वेक्षण करून घेतले तसेच स्थानिक अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांना कोणतेही गाव वंचित राहू नये या दृष्टीने सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व्हे पूर्ण होऊन जल जीवन मिशनच्या आराखड्यात गावांचा समावेश झाला आणि आता टप्प्याटप्प्याने या गावांना प्रशासकीय मान्यता मिळत आहे.
प्रतिक्रिया
प्रत्येक घर पिण्याच्या पाण्याच्या योजनेतून जोडण्याचं माझं ध्येय आहे. सरकार सरकारच्या मदतीने या योजनांना मंजुरी मिळत असल्याने मला त्याचा आनंद आहे. उर्वरित सर्व गावे या योजनेत घेण्याचा माझा मानस असून ती देखील टप्प्याटप्प्याने घेतली जातील. –
आमदार रोहित पवार