Home ताज्या बातम्या शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना...
शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं.
कराड: विधानसभेचा महासंग्राम संपला आहे. महायुतीला जनतेला कौल मिळाला असून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील रणधुमाणी आता काही प्रमाणात शांत झाली आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचले. तिथेच त्यांची भेट आमदार रोहित पवार यांच्यासोबत झाली. तिथे त्यांच्या एक किस्सा घडला आहे. अजित पवारांनी मिश्किल शब्दांत पुतण्या रोहित पवार यांना टोला लगावला आहे. सध्या अजितदादा आणि रोहित पवारांची हे भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
आज दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते कराडला पोहोचले आहे. शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील हेदेखील पोहोचले होते. तर, अजित पवार देखील समाधी दर्शनासाठी कराडला पोहोचले आहेत. तिथेच त्यांची भेट रोहित पवार यांच्यासोबत झाली. तेव्हा अजितदादांनी रोहित पवारांना थेट काकांचे दर्शन घेण्याचा आदेश दिला. या भेटीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
काय घडलं नेमकं?
कराडमध्ये प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. ‘माझी सभा झाली असती तर काय झालं असतं…’ असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला आहे. तसंच, दर्शन घे काकाचं असं म्हणताच काकाच्या पाया पडत अर्थात अजित पवार यांच्यापुढं नतमस्तक होत रोहित पवारांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला. पण, ‘थोडक्यात वाचला…’ असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोलाही लगावल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार काय म्हणाले?
‘माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आहे पण शेवटी जी काही संस्कृती आहे. एक वडिलधारी व्यक्ती आणि माझ्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे काका असल्यामुळं शेवटी संस्कृती असल्यामुळं पाया पडणं ही जबाबदारी आहे. ही (कराडची) जी भूमी आहे, तिथं भेदभाव करून चालत नाही, इथं संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती पाळतो’, असं रोहित पवार म्हणाले.
error: Content is protected !!