पुणे प्रतिनिधी, दि.५ जानेवारी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पद्म पुरस्कार देण्यावरून केंद्र सरकारने केलेल्या विधानावरून भारतात चांगलेच रणकंदन उठले आहे. केंद्र सरकारला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य माहित नाही का अशा अनेक तीव्र तिखट प्रतिक्रिया सोशल मीडियावर झळकत असून आता कर्जत जामखेड चे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर चांगलीच खरपूस टीका केली आहे.
नकली घोड्यावर बसून सामाजिक दुहीचा सूर आळवणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो, पण ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली’ या लावणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राण फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने ‘प्रतिष्ठित’ नाहीत.
अशाप्रकारे रोहित पवार यांनी केंद्र सरकारला सणसणीत शाब्दिक टोला लावला असून कथा, लोकवाङमय, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गण, गवळण, प्रवास वर्णन अशी विपुल साहित्य सेवा केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा,ही केंद्र सरकारला विनंती केली आहे.