राजेंद्र जैन / कडा
————–
लग्नसोहळा म्हटला की अनावश्यक खर्च, थाटमाट, सत्कार समारंभ अन् मोठेपणाचा आव, याबाबी नवीन नाहीत. बहुतेक नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र कड्यातील ढोबळे व करंदी येथील कावरे कुटूंबियांनी लग्नात सत्कारासाठी होणा-या अनावश्यक खर्चाला फाटा देत, लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना थोर लेखक विचारवंताचे एक पुस्तक अन् गुलाबपुष्प भेट देऊन आदर्श विवाह घडून आणला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील केशवराव आबासाहेब ढोबळे यांची सुकन्या चि.सौ. कां. अंजली व करंदी (ता. पारनेर) येथील गणपतराव शिवाजी कावरे यांचे चिरंजीव प्रविण या कुटूंबियांचा नुकताच आगळवेगळा आदर्श विवाहसोहळा संपन्न झाला आहे. शहरात असो की एखाद्या ग्रामीण भागात लग्नसोहळा म्हटला की, अनावश्यक खर्च, थाटमाट, सत्कार समारंभ अन् मोठेपणाचे प्रदर्शन करण्याची जणूकाही स्पर्धाच पाहावयास मिळत असते. त्यामुळे आयुष्यभर
लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडण्यातच वधुपित्याची अनेकदा दमछाक होत असते. मात्र ढोबळे आणि कावरे या दोन्ही कुटूंबियांनी सत्काराच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन एक आदर्श विवाहाचा पायंडा घालून दिला, असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाजात लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला कुठतरी चालना मिळावी. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या दोनही कुटूंबियांनी लग्नसोहळ्यात सत्कार समारभासाठी केल्या जाणा-या अनावश्यक खर्चाला फाटा देत, त्याऐवजी लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी अशा थोर महापुरुष, लेखक विचारवंताची पुस्तके विविध कथा, कादंबरीसह गुलाबपुष्प भेट देऊन अनोखा आदर्श विवाह घडून आणला आहे. तसेच लग्नात आहेर स्वरुपात आलेली रक्कम देखील परोपकराची भावना बाळगून सेवाभावी संस्थेला मदत करण्याचाही संकल्प केला असल्याचे वधुपिता केशवराव ढोबळे यांनी सांगीतले.
—-%%———
वाचन संस्कृतीला बळ देण्याचा स्तुत्य उपक्रम
—————–
सध्या समाजात पुस्तकांपेक्षा मोबाईलचा वापर वाढू लागल्याने वाचनाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे तरुणाईत वाचनाची गोडी निर्माण होऊन वाचन संस्कृतीला कुठतरी चालना मिळावी. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ढोबळे व कावरे परिवाराने लग्नाला येणा-या पाहुण्यांना थोर महापुरुषांची पुस्तके, कादंबरी भेट देऊन वाचन संस्कृतीला चालना देण्याचा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे असे मत सराटेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सिध्देश्वर शेंडगे व्यक्त केले.



