

जामखेड शहर विकसित व सुरक्षित ठेवायचे आहे, राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या – आ. रोहित पवार
जामखेडच्या महाविकास आघाडीच्या सांगता सभेला अभूतपूर्व प्रतिसाद!
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०३० च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, १ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेली जाहीर सांगता सभा पार पडली. शहरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘सुरक्षित जामखेड, विकसित जामखेड’ च्या घोषणा देण्यात आल्या.

या सभेत बोलताना आमदार रोहीत पवार यांनी भाजप व त्यांच्या उमेदवारांवर रोखठोक टीकास्त्र सोडले. भाजपने मटका, सावकारी आणि रेल्वे लुटीशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप करत, जामखेडकरांनी अशा उमेदवारांना घरीच बसवावे असे आवाहन त्यांनी केले. मागील सहा वर्षांत करोडो रुपयांचे विकासकाम पूर्ण केल्याचा उल्लेख करत, आगामी काळात आणखी भरीव विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपकडून त्यांच्या उमेदवारांच्या घरच्यांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करून, “उद्या मी पूर्ण दिवस शहरात असेन, मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला, तर गाठ माझ्याशी आहे,” असा कडक इशाराही भाजपला दिला.

सभेला उपस्थित शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी भाजपवर विकासकामांची खिचडी केल्याचा आरोप करत, रोहित पवारांनी मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना आणि कॅमेरा प्रकल्प भाजपने बंद पाडल्याचे सांगितले. “संध्या शहाजी राळेभात यांना निवडून दिल्यास शहरात स्वच्छ पाणी, चांगले रस्ते आणि मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची हमी मिळेल,” अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, व्याख्याते यशवंत गोसावी, RPI नेते सचिन खरात आणि गोविंद पोलाद यांनीही सभेत मार्गदर्शन करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जामखेडमधील महत्त्वाची विकासकामे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, मुख्यमंत्र्यांच्या जामखेड दौर्यासाठी विशेष GR काढावा लागला, हे शहराचे राज्यातील वाढते महत्त्व दर्शवते, असे आमदार पवार म्हणाले. यावेळी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास “चौकाचौकात मटका आणि जुगार फोफावेल,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘तुतारी’ या चिन्हासमोर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.






