

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत ‘तिसरी आघाडी’ बनेल बदलाची ताकद- ॲड. डॉ. अरूण जाधव.
वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शेकापची तिसरी आघाडी रंगत वाढवणार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत असून आज तिसऱ्या आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. राज्याचे नेतृत्व करणारे दोन दिग्गज नेते जामखेडमध्ये असतानाही शहरातील अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. या दोघांच्या राजकीय संघर्षात जामखेडकरांचा श्वास गुदमरला असून ‘तिसरी आघाडी’ हा मार्ग मोकळा करणार असल्याचा दावा ॲड. डॉ. अरूण जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.

वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि शेकाप यांच्या संयुक्त पुढाकारातून तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. जामखेडच्या मूलभूत प्रश्नांवर—आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा—समर्पितपणे काम करण्यासाठी ही आघाडी निवडणुकीत उतरली असून त्यामुळे निवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे.
पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अँड. डॉ. अरूण जाधव, काँग्रेसचे राहुल उगले, अरविंद जाधव, वसिम बिल्डर, अन्सार पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या जैनब वाहेद कुरैशी यांची उमेदवारी जाहीर केली. प्रभाग ६ साठी अँड. डॉ. अरूण जाधव व संगिता भालेराव (वंचित बहुजन आघाडी), प्रभाग ५ मधून काँग्रेसच्या शितल शेलार व पुरस्कृत भारत पवार, तर प्रभाग ८ मधून काँग्रेसचे राहुल उगले हे उमेदवार रिंगणात आहेत.





