


सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना जामखेड बसस्थानकातुन अटक, बसस्थानकात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून केली कारवाई
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील सराफ दुकानदाराची फसवणूक करत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पन्नास हजार रुपयांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले. जामखेड बसस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

अटक झालेल्या महिलांची नावे शांताबाई राधाकिसन जाधव (वय 55, रा. हिवरसिंगा, ता. शिरुर, जि. बीड) आणि नीलावती लक्ष्मण केंगार (वय 52, रा. मुर्शदपूर, जि. बीड) अशी आहेत. फिर्यादी हरिओम बापू मैड (वय 20, रा. गदादेनगर, कर्जत) यांच्या साई ज्वेलर्स दुकानात या दोन्ही महिला सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्या हात चलाखीने दुकानातील 38 हजार 95 रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारून पसार झाल्या. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवाशांचे दागिने चोरी होण्याच्या आणि सराफ दुकानदारांची फसवणूक होण्याच्या अनेक घटना घडत होत्या. या सर्व गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखेने सुरू केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलिस अंमलदार हदय घोडके, भीमराज खर्से, श्यामसुंदर जाधव, योगेश कर्डिले, महादेव भांड आणि महिला पोलिस अंमलदार चिमा काळे यांच्या पथकाला विशेष सूचना दिल्या. तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की बीड जिल्ह्यातील काही महिला जामखेड परिसरात सराफ दुकानदारांचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करत आहेत. त्यानुसार पथकाने जामखेड बसस्थानक परिसरात सापळा रचून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या महिलांकडून पन्नास हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







