Home क्राईम न्यूज माजी सरपंचाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

माजी सरपंचाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

 

माजी सरपंचाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी

जामखेड प्रतिनिधी

जुन्या भांडणाचा राग मनात धरून खर्ड्याचे माजी सरपंच संजय गोपळघरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी घडली. या घटनेनंतर खर्डा पोलिसांनी तत्परता दाखवत केवळ काही तासांत आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शिवाजी गोपाळघरे हे मोटारसायकल वरून सिताराम गडकडे जात असताना सायंकाळी सुमारे सव्वासहा वाजता त्यांच्या परिचयातील इसम संतोष उर्फ पोपट जगन्नाथ सुरवसे (रा.खर्डा वडारवाडा, ता. जामखेड) यांनी हात देऊन थांबवले आणि “मला समोर सोडा” असे सांगून मोटारसायकलवर बसले. काही वेळातच अचानक सुरवसे याने गाडीवर बसलेल्या अवस्थेत धारदार हत्याराने गोपाळघरे यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात गोपाळघरे गंभीर जखमी झाले असून त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली.

या प्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 166/2025, भारतीय न्याय संहिता कलम 109(1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. तपासा दरम्यान आरोपी संतोष उर्फ पोपट जगन्नाथ सुरवसे याचा शोध घेऊन त्यास अल्पावधीत अटक करण्यात आली. नंतर आरोपीस कर्जत येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, वैजिनाथ मिसाळ, अशोक बडे, गणेश बडे व योगेश भोगाडे यांनी सहभाग नोंदवला.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत हे करीत असून आरोपीने फिर्यादीवर हल्ला करण्याचे नेमके कारण तपासात स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात पेट्रोलिंग वाढवले असून नागरिकांना कोणताही अफवा पसरवू नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा भंग होईल असे कृत्य टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!