


शहरातील प्रश्ना संबधात जामखेड बचाव कृती समितीच्या बैठक संपन्न
रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज महावीर मंगल कार्यालय येथे सर्व शहरातील सामान्य नागरिक व्यापारी व संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्यांच्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थित नागरिकांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “ नेमके कामास मुहूर्त का सापडेना कशाचा अडथळा आहे?!” अशा शब्दांत नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली.

अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे सध्या शहरात उडणारी धूळ, चिखल, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यामुळे सगळीकडे त्रस्त नागरिक आणि व्यापारी वर्ग दिसत आहेत. या परिस्थितीमुळे दुकानांवरील ग्राहकांची ये-जा कमी झाली असून व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास, शाळकरी मुलांना व वृद्धांना प्रवासात अडचणी, तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे.
या बैठकीस जामखेडचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपरिषदेचे अधिकारी, संबंधित कॉन्ट्रॅक्टर तसेच नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी व्यापारी वर्गाच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले.
कॉन्ट्रॅक्टरने या बैठकीत “तात्काळ काम सुरू करण्यात येईल” असा शब्द दिला असून, पोलीस प्रशासनाने कामकाजासाठी पूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच नगरपरिषद प्रशासनही या कामात पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीच्या शेवटी, जामखेड बचाव कृती समितीने प्रशासन, पोलिस, नगरपरिषद आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे आभार मानले आणि शहरातील विकासकामे योग्य नियोजनाने व जलदगतीने पार पाडण्याची मागणी केली. जामखेड शहरातील त्रस्त नागरिक आणि व्यापारी वर्ग यांच्या अपेक्षा आता प्रशासनाकडे लागल्या आहेत लवकरच व्यवस्थित रस्ता मिळावा, हीच सर्वांची मागणी आहे.






