


राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन
अहिल्यानगर : भाजपचे आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले (वय ६६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने आहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.

नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पआजाराने निधन झाले. आ.कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत मोठा विजय मिळवला होता. बुऱ्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्वगुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधान सभेवर निवड़न गेले होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता. नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात त्यांचा मोठा वर चष्मा होता.

कामाचा आमदार आणि अफाट जनसंपर्क असलेला नेता आज (दि. १७) नगर जिल्ह्यानं गमावला आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता बुर्हानगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, अमदार कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आमदार कै. कर्डिले हे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तर अक्षय कर्डिले यांचे वडील होते. आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.








