जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना जाहीर; ३१ ऑगस्टपर्यंत हरकतींसह सूचना मांडण्याची संधी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेच्या सन २०२५ ते २०३० साठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आज सोमवारी दि. १८ रोजी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साळवे यांनी सोमवारी (ता. १८) प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. या हरकती व सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करावयाच्या आहेत, तर प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांसंदर्भात हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी नगरपरिषदे मार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. दि. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरदरम्यान प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान सुनावणी नंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांमार्फत नगरविकास विभागास सादर करण्यात येणार आहे.

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागामार्फत १२ सप्टेंबर ते १८ सप्टेबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येईल, तर २६ सप्टेबर ते ३० सप्टेबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगा मार्फत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणूक कार्यक्रमा नुसार जामखेड या “क” वर्ग नगरपरिषदेचीही निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली असून दि., १० जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार जामखेड नगरपरिषदेसाठी निवडून देण्यात येणाऱ्या नगरसेवकांची एकुण संख्या २४ असणार असून त्यापैकी सर्व प्रवर्गातील मिळून १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here