

हॉटेलमध्ये वेटरची तरुणास लाकडी काठीने मारहाण, तरुणाचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शिऊरफटा या ठिकाणी एका हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास काहीएक कारण नसताना एका वेटरने तरुणास लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हॉटेल मधिल वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ज्योतीराम शामराव काशिद वय 36 वर्षे रा. काशिद वस्ती. सारोळा, ता. जामखेड असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ लक्ष्मण शामराव काशिद वय 30 वर्षे रा. काशिद वस्ती, सारोळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दिपक गुलाबराव सातपुते रा. मनमाड जिल्हा नाशिक याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी लक्ष्मण काशिद यांचा भाऊ ज्योतीराम काशिद हा काल दि 17 रोजी सायंकाळी घरातुन मोबाईलवर बोलत बोलत घराबाहेर गेला होता. मात्र रात्रभर तो घरी आलाच नाही. यामुळे मयताचा भाऊ लक्ष्मण काशिद याने त्यास सकाळी फोन लावला मात्र त्याने फोन उचलला नाही. यानंतर सकाळी साडेनऊ वाजता मयताचा भाऊ यास समजले की त्याच्या भावाला शिऊरफटा येथिल एका हॉटेलमध्ये मारहाण झाली आसुन तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर मयताचा भाऊ हा आपल्या नातेवाईकांन समवेत घटनास्थळी आला व त्या ठिकाणी रक्ताने माखलेली काठी दिसुन आली. यावेळी त्या ठिकाणी आरोपी वेटर दिपक गुलाबराव सातपुते रा. मनमाड याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल करीत सांगितले की मीच मयत ज्योतीराम काशिद यास काही कारण नसताना लाकडी काठीने मारहाण केली आहे असे सांगितले. या मारहाणीत मात्र ज्योतीराम काशिद याचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देवीदास पळसे, नवनाथ शेकडे, गणेश काळाने, कुलदीप घोळवे हे घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले. यानंतर पो. कॉ. देविदास पळसे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना माहिती दिली यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका व सोबत दीपक भोरे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत ज्योतिराम काशिद याचा मृतदेह आपल्या रुग्णवाहिकेतुन आणून जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करीत आहेत.






