

अहिल्यानगर जिल्ह्यात फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
अहिल्यानगर: नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण आगीच्या घटनेने परिसर हादरला आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

नेवासा फाटा कॉलेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानाला रात्री 1 च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले. आगीचा भडका इतका तीव्र होता की, कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल (वय 30), त्यांचे दोन मुलं अंश (वय 11), चैतन्य (वय 6) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने बचावले.

फर्निचरच्या दुकानाला नेमकी आग कशामुळे लागली? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत एकाच कुटुंबातील पाच जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. दुकानातील लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.





