

स्वातंत्र्यदिनी बांधखडक येथे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे व्याख्यान
जामखेड प्रतिनिधी
स्वतंत्र भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठिक ८:०५ वाजता शालेय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पद्मश्री राहीबाई पोपेरे या बी.बी.सी.वर्ल्डने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रेरणादायी व प्रतिभावान महिलांपैकी एक असून त्यांनी शेकडो गावठी बियाणांच्या वाणांचे जतन व संवर्धन केल्याच्या कार्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी ‘बीजमाता’ या उपाधीने प्रथम त्यांचा गौरव केला . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘जीवन गौरव’ पुरस्कारासह भारत सरकारने ‘नारी शक्ती’ तसेच ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करून त्यांच्या पर्यावरणवादी कार्याचा सन्मान केला आहे. शेकडो पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या तसेच मसुरी (उत्तराखंड) येथील भारत सरकारच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासक अकादमी येथे तब्बल १८३ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा पंचक्रोशीतील सर्व आबालवृद्धांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विकास सौने व आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी केले आहे.





