

जामखेड आगाराच्या बस डीजेल अभावी होत्या बंद, प्रवाशांचे झाले हाल,
डिझेल अभावी जामखेड आगार बंद करण्याची वेळ आली, आ. रोहीत पवार यांची सोशल मिडिया द्वारे सरकारवर टीका
जामखेड प्रतिनिधी
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या जामखेड आगारात पुन्हा एकदा डिझेल तुटवडा जाणवत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून दि ११ पासून दुपारनंतर डिझेल अभावी सर्व एसटी बसेस जागेवरच उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड झाले. आगारातून सुटणाऱ्या शहरी तसेच ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या बस डिझेल अभावी बंद होत्या. त्याचा परिणाम काही फेऱ्यांवर झाल्याने एसटीला दैनंदिन मिळणाऱ्या लाखभर रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. आज दि १२ रोजी दुपारी ३ पर्यंत डिझेलचा टँकरच आला नव्हता.

जामखेड शहर चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने येथील बसस्थानकात ये-जा करणाऱ्या बसची संख्या जास्त आहे. जामखेड आगारात एकूण ५१ बसेस आहेत. या आगारातून पुणे, मुंबई, बारामती करमाळा, नाशिक, कोल्हापूर, सातारा व अहिल्यानगर, यासह अन्य जिल्ह्यात एसटी बस धावतात त्यामुळे येथील बसस्थानक २४ तास प्रवाशांच्या सेवेसाठी खुले असते. जामखेडला आलो तर निश्चितच बस मिळते, हे जरी खरे असले तरी, बसच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी जागे राहून किंवा झोप घेऊन बस स्थानकात रात्रभर थांबतात. त्यामुळे स्थानक परिसरातील व बाहेर हॉटेल व इतर दुकाने दिवस रात्र चालू असतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून वाहक आणि चालकांना डिझेल अभावी अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सकाळीच्या वेळी डिझेल मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.

केवळ चुकीच्या नियोजनामुळे बस डेपोतच उभ्या आहेत. या नुकसानीस जबाबदार कोण? एस. टी. महामंडळाच्या गलथान काराभारामुळे महामंडळासहीत सर्वच जण अडचणीत सापडले आहेत. केवळ डिझेल (Diesel) अभावी बस डेपोत उभ्या राहत असतील तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही, जामखेड आगाराला बससाठी लागणारे डिझेल स्वत:च्या उत्पन्नातून आणावे लागते. डिझेलचे वाढते दर खराब रस्त्यांमुळे बसचा वाढता खर्च पाहता बस आगाराला एक टँकर डिझेल आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. जामखेड आगाराच्या आशेवर असलेल्या प्रवाशांना तासनतास इतर ठिकाणावरून येणाऱ्या बसची वाट पहावी लागते. आखेर आज दि १२ ऑगस्ट 2025 रोजी दुपारी उशिरा डीजेल जामखेड आगात दाखल झाल्यानंतर बस सेवा सुरू झाली मात्र तोपर्यंत प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

फेसबुक पोष्ट टाकत काय म्हणाले आ. रोहीत पवार……
जामखेड एसटी डेपोसाठी मागितलेला डिझेलचा टँकर काल पाच वाजता येणं अपेक्षित असताना वेळेवर आला नाही. त्यामुळं डिझेल अभावी जामखेड एसटी डेपो बंद करण्याची वेळ आली. एकीकडं रॅपिडोचं ‘इंधन’ मिळाल्याने मंत्री महोदय सुस्साट आहेत तर त्यांच्या खात्याचा एसटी डेपो मात्र इंधनाअभावी बंद आहे. मुख्यमंत्री महोदय, ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’, अशी जाहिरात तुम्ही केली होती, पण महाराष्ट्राची धावणारी एसटी थांबलीही आणि ठप्पही झाली…!







