जामखेड तालुक्यात पुन्हा लंपी आजाराने डोके वर काढले, पशुपालका मध्ये खळबळ, तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा रामभरोसे

जामखेड प्रतिनिधी

जनावरांमध्ये संसर्गजन्य लंम्पी आजाराचे लक्षणे दिसून आल्याने पशुपालन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड तालुक्यात पुन्हा लंपी आजाराने डोके वर काढले आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा रामभरोसे चालू असल्याचे चित्र दिसून येते.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील पशुपालक सुरेश ढेरे यांच्या गाईला मागील तीन दिवसापासून अंगावर मोठे फोड आले, पायाला सूज, ताप, खायला कमी, तोंडातून लाळ गळते, नाकात फोड, मानेला सूज, नाकातून पाणी येऊन दूध कमी देऊ लागल्याने सुरेश ढेरे यांनी सरकारी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे खाजगी डॉक्टरकडून उपचार करून घेण्याची वेळ आल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या संसर्गजन्य लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. अवर्षण प्रवण दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यात लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे पशुधन वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसून आला. शेतीला पूरक धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी करताना दिसून येतो. त्यातच पशुपालकांना लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

पशुवैद्यकीय सेवेची परिस्थिती जामखेड तालुक्यात पाहिले असता अनेक पदे रिक्त आहेत. सध्या कारभारावरच अतिरिक्त पशुधन विकास अधिकात्यावर पशुसेवा चालू आहे. परंतु सध्या जामखेड तालुक्यात तीन पशुधन विकास वैद्यकीय अधिकारी अपेक्षित असताना दोन अतिरिक्त पशुधन विकास अधिकाऱ्यावर काम चालू आहे. तालुक्यातील जामखेड, खर्डा व नान्नज या ठिकाणी तीन पशुधन वैद्यकीय अधिकारी अपेक्षित असताना दोन पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यावर अतिरिक्त कारभारावर वैद्यकीय सेवा चालू आहे. त्यातच तालुक्यात सात पशुवैद्यकीय दवाखाने असून यापैकी जातेगाव येथील पशुधन पर्यवेक्षक हे पद रिक्त आहे. यामुळे सध्या जामखेड तालुक्यातील पशु सेवा ही अतिरिक्त कारभार म्हणजेच रामभरोसे चालू असल्याचे दिसून येते.

सरकारी दवाखान्यात गेलो असता तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी डॉक्टरकडून उपचार करण्याची वेळ आली. शासकीय माणूस नसल्याने तक्रार कोणाकडे करायची.

(सुरेश ढेरे, पशुपालक , खर्डा)

कर्मचारी रिक्त पदे असल्याने लसीकरण करण्यास अडचण येते, खाजगी पशु वैद्यकीय सेवा करणारा डॉक्टरची लसीकरण करण्यास मदत घ्यावी लागते, पशुपालकांची निरोगी जनावरांची लसीकरण करण्यासाठी उदासीनता दिसून येते, तालुक्यात लसीकरण मोहीम चालू आहे.

(डॉ. बाळकृष्ण कांबळे,
अतिरिक्त पशुधन विकास अधिकारी, जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here