हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर नवविवाहित पत्नीला अटक
इंदौर: इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. मेघालयातील शिलाँग येथे १७ दिवसांपूर्वी हनिमूनसाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेली सोनम रघुवंशी अखेर उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यावर सापडली. सोनमने तिच्या कुटुंबाशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर कुटुंबियांनी इंदौर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर इंदौर पोलिसांनी गाझीपूर पोलिसांना कळवलं आणि सोनमला ताब्यात घेण्यात आलं.
मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अखेर उकलले आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती आणि त्यांचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर सोनम बेपत्ता झाली होती. सोनमला आता पोलिसांनी गाझीपूर येथून अटक केली आहे. गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी याला दुजोरा दिला. मेघालय पोलिसांनी राजाच्या हत्येमध्ये त्याच्या पत्नीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती दिली.
१७ दिवसांच्या सस्पेन्सनंतर, इंदौरच्या राजा आणि सोनमच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मेघालयात हत्या झालेल्या राजाच्या पत्नीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे. मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम रघुवंशी या हत्येत सहभागी होती आणि तिने मध्य प्रदेशातील तीन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती.
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनीही एक्स पोस्टवरुन या प्रकरणाची माहिती दिली आहे. “मेघालय पोलिसांनी राजा हत्याकांडात ७ दिवसांत मोठी कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशातील ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, एका महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी मोहीम अजूनही सुरू आहे,” असं मुख्यमंत्री कॉनराड संगमा म्हणाले.
१७ दिवसांनंतर सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. सोनमने ढाब्यावरून तिच्या कुटुंबाला फोन करून तिचे ठिकाण सांगितले. कुटुंबाने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गाझीपूर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. ती शिलाँगहून गाझीपूर कशी पोहोचली आणि या १७ दिवसांत तिच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या तिची चौकशी करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा सोनम थकली होती आणि अस्वस्थ अवस्थेत दिसत होती.