सरपंचाचे भर दुपारी अपहरण करून खून; केज तालुक्यातील घटना
केज – तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे वाहनातून गावाकडे जात असताना सोमवारी (ता.०९) दुपारी वाहन अडवून भर रस्त्यातून अपहरण करून त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच मस्साजोग ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर व उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो (एमएच- ४५/ बी-३०३२) मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी शिवराज देशमुख हे कार चालवीत होते.
ते केजहून मस्साजोगकडे जात असताना डोणगाव फाट्याच्याजवळ असलेल्या टोलनाक्या जवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ (एमएच-४४/झेड-९३३३) त्यांच्या वाहनासमोर आडवी लावली. त्या स्कार्पिओतून सहा जण खाली उतरले. त्यातील एकाने दरवाज्याची काच दगडाने फोडून कारमध्ये पाहिले व दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजुला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली. अज्ञात अपहरणकर्त्यानी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केज शहराच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले.
अपहरण केल्यानंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने दोन पोलीस पथके तपासाठी रवाना करण्यात आले. या पोलीस पथकातील पोलीसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज- नांदूरघाट रस्त्यावर दैठना फाटा येथे मिळून आला. मयताच्या अंगावर मारहाणीचे व शास्त्राचे वार आहेत. पोलीसांनी मृतदेह रूग्णवाकहिकेतून केज उपजिल्हा रुग्णालया आणला आहे.
त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेणार नाहीत, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेने निर्माण झालेली ताणावाची परिस्थिती विचारात घेऊन शहरात पोलीसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे.
तरुण सरपंचाचा खून म्हणजे बीडचा बिहार : खा. बजरंग सोनवणे
सरपंच यांना गाडीत टाकून नेले आणि खून केला घटना दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे. तरुण सरपंचाचा खून म्हणजे बीडचा बिहार असे खा. बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. पवनचक्की च्या खंडणी प्रकरणात झालेला खून व त्या मागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक जर फोन उचलणार नसतील तर गंभीर आहे. आपण सदरील प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असून झालेला खून हा बीड पोलीस यंत्रनेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे, असेही खा. सोनवणे म्हणाले.
खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही.
दरम्यान, महिला व पुरुष रस्त्यावर बसलेले असून संतप्त नागरिकांनी तीन एसटी बसेसची तोडफोड केली आहे. या मार्गावरील वाहतूक काळे गाव-हनुमंत पिंपरी-केवड-चिंचोली माळी मार्गे वळविण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि बीडचे अप्पर पोलीस अधिकक्षक मस्साजोग येथे तळ ठोकून असून पोलीस मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही आणि रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली असल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
error: Content is protected !!