Home ताज्या बातम्या अखेर कोंभळी – खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द !

अखेर कोंभळी – खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द !

अखेर कोंभळी – खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द !
आ. प्रा.राम शिंदेंनी करून दाखवले : कर्जत एमआयडीसीच्या प्रश्न निघाला कायमस्वरूपी निकाली
कर्जत-जामखेड, प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या राजपत्रात कर्जत तालुक्यातील कोंभळी – खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसुचना १४ ऑक्टोबर २०२४ रोजी उद्योग विभागाने जारी केली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे कर्जतमधील हजारो युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसीची सुरुवात मीच केली आणि शेवटही मीच करणार’ हा जनतेला दिला शब्द आमदार प्रा राम शिंदे यांनी खरा करून दाखवला आहे. गेल्या पाच वर्षांपासून गाजत असलेल्या कर्जत एमआयडीसीच्या प्रश्नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आमदार प्रा.राम शिंदे यांना यश आले आहे.
कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी ही गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास आली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने कर्जत तालुक्यातील कोंभळी खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसुचना शासनाच्या राजपत्रात जारी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार उद्योग विभागाच्या राजपत्रात कोंभळी खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसुचना १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कर्जत एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव – खंडाळा भागात एमआयडीसी उभारण्याचा घाट घातला होता. देशाला फसवून परागंदा झालेल्या निरव मोदी व इतर धनदांडग्यांच्या जागेत ही एमआयडीसी होणार होती, परंतू आमदार प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा हा डाव हाणून पाडला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जागेत एमआयडीसी व्हावी ही तमाम कर्जतकरांची इच्छा पुर्ण करण्यासाठी आमदार शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार त्यांनी नवीन जागा शोधत त्या ठिकाणी एमआयडीसी करण्याची मागणी सरकारकडे केली होती.
उद्योग विभागाचे निकष पुर्ण करणारी कोंभळी – खांडवी परिसरातील जागा एमआयडीसीसाठी निश्चित करण्यात आली होती. या भागात एमआयडीसी व्हावी याकरिता आ. राम शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. महायुती सरकारच्या माध्यमांतून आमदार प्रा. राम शिंदे यांनी १५ मार्च २०२४ रोजी मौजे कोंभळी – खांडवी परिसरात एमआयडीसी मंजुर करून आणली होती. सदर जागेची भूनिवड समितीने पाहणी केल्यानंत ३ जुलै २०२४ रोजी रूपरेखा सर्वेक्षण ( contour survey) करण्यात आले होते. त्यामुळे कर्जत एमआयडीसीच्या निर्मितीला वेग आला होता. सदर एमआयडीसीचे भूसंपादन कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, २ ऑगस्ट २०२४ रोजी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीची १६३ वी बैठक पार पडली. या बैठकीत कर्जत एमआयडीसी निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली. कोंभळी व खांडवी शिवारातील सुयोग्य व समतल असलेले क्षेत्र या एमआयडीसीसाठी निश्चित करण्यात आले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (३) यांच्या अध्यक्षतेखाली भूनिवड समितीने २६ जून २०२४ रोजी केलेल्या अहवालानुसार कोंभळी शिवारातील खाजगी १६८.२३ हेक्टर आर व मौजे खांडवी शिवारातील ७७.८२ हेक्टर आर अशी एकुण २४६.०५ हेक्टर खाजगी क्षेत्र संपादित करण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी देत मऔवि अधिनियम १९६१ अन्वये प्रकरण ६ व कलम २ खंड (ग) च्या तरतुदी लागू करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश उद्योग विभागाने २९ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केले होते.
त्यानंतर आता १४ ऑक्टोबर २०२१४ रोजी उद्योग विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार कोंभळी – खांडवी एमआयडीसीची अंतिम अधिसुचना राजपत्रात प्रसिध्द केली आहे.
राजपत्रात म्हटले आहे की, क्रमांक आयडीसी २०२४/ (प्र.क्र.४७२)/ उद्योग-१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम १ पोट-कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौजे कोंभळी व खांडवी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १४ ऑक्टोबर २०२४ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे. असे म्हटले आहे. या राजपत्रात एमआयडीसीसाठी आरक्षित करण्यात आलेले गट नंबर निहाय क्षेत्राची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारच्या उद्योग विभागाने कर्जत तालुक्यातील मौजे कोंभळी – खांडवी येथील एमआयडीसीसाठी अंतिम मंजुरी देत औद्योगिक क्षेत्र घोषित केले आहे. महायुती सरकार व आमदार राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून कर्जतकरांची स्वप्नपुर्ती झाली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे एमआयडीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच भूसंपादन सुरु होणार आहे.
चौकट
” महायुती सरकारने कर्जत तालुक्यातील कोंभळी एमआयडीसीला अंतिम मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे कर्जत व जामखेडच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार”
आमदार प्रा.राम शिंदे, माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!