जामखेड (ता.१५ )प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप २०२३ च्या पिकविम्याची उर्वरित रक्कम कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी १२४.४ कोटी रुपये मंजूर झाली असून ही पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी अधिकारी आणि विमा कंपनीकडे पाठपुरावा केला होताच शिवाय विधिमंडळाच्या अधिवेशनातही या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यापूर्वी मागील वर्षीच्या खरीप पिक विम्याचे कर्जत तालुक्यासाठी ९४ कोटी ६२ लाख आणि जामखेड तालुक्यातील ८१ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले. त्यातील कर्जतमध्ये ३० कोटी आणि जामखेडमध्ये २२ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते. मात्र उर्वरित पीक विम्याच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. आमदार रोहित पवार यांनी गेल्या वर्षी प्रशासनाच्या सहकार्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मदतीने गावोगावी स्वतःची यंत्रणा राबवून शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे फॉर्म भरुन घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा भरण्यात कर्जत-जामखेड मतदारसंघाचा अव्वल क्रमांक होता. केवळ फॉर्म भरण्यापुरतेच आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले नाहीत तर पीक विमा हा नियमात बसताच तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अधिकारी, मंत्री आणि विमा कंपनीकडे त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवून ही रक्कम तातडीने मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाकडून विमा कंपन्यांना प्रलंबित रक्कम देण्यात यावी आणि नुकसान भरपाईच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच उर्वरित रक्कम कर्जतसाठी ६४.४० कोटी आणि जामखेडसाठी ६० कोटी रुपये मंजूर झाले असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर आमदार रोहित पवार यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि त्यांचे प्रश्न लावून धरत ते मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना भरघोस पीक विम्याची रक्कम मिळवून दिलीच पण आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वीची मतदारसंघातील शेतकऱ्यांची रखडलेली ११० कोटी रुपये पीक विम्याची रक्कमही त्यांनी मिळवून दिली होती. पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांवर कोणतेही आंदोलन करण्याची वेळ येऊन न देता आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.
कोट,
सरकार मार्फत पिकविमा उतरवला जातो परंतु नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अनेक अडचणी येतात. यासंदर्भात मी व्यक्तीशः अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर खरीप २०२३ च्या पिकविम्याची उर्वरित रक्कम कर्जत साठी ६४.४० कोटी व जामखेड साठी ६० कोटी मंजूर झाली असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनी आपापल्या भागातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून आपली काही कागदपत्रांची पूर्तता राहिली असल्यास करून घ्यावी जेणेकरून पिकविम्याची १०० टक्के रक्कम सर्वांच्या खात्यात जमा होईल आणि काही अडचण असल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा.